

बँकॉक; वृत्तसंस्था : भारताच्या किरण जॉर्जने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवताना चीनच्या जागतिक क्रमवारीतील नवव्या मानांकित शी यू क्वीला पुरुष एकेरीत पराभवाचा धक्का दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या दहामधील एखाद्या खेळाडूला नमवण्याची किरणची ही पहिलीच वेळ आहे. थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेतील पहिल्या दिवसात पीव्ही सिंधूचा पराभव मात्र धक्कादायक ठरला. (Kiran George)
पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्विकराज रंकीरेड्डी यांनी डेन्मार्कच्या फ—ेडरिक व रॅसमस यांना 21-13, 18-21, 21-17 अशा फरकाने पराभूत करत दुसर्या फेरीत आगेकूच केली. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने 21-23, 21-15, 21-15 असा पिछाडी भरून काढणारा विजय नोंदवला. त्याचा चायनीज तैपेईचा प्रतिस्पर्धी वँग झू वेईला निर्णायक टप्प्यात अपयशाला सामोरे जावे लागले. (Kiran George)
पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांचे पहिल्याच फेरीत पराभूत होणे खळबळजनक ठरले. किदाम्बी श्रीकांतला चीनच्या वेंग हाँग यांगकडून 8-21, 21-16, 14-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला तर सिंधूने या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची ही 2014 नंतरची पहिलीच वेळ ठरली. तिला कॅनडाच्या मिशेली ली हिने 8-21, 21-18, 18-21 असे नमवले.
ओडिशा ओपन 2022 स्पर्धेतील विजेता जॉर्जने शी यू क्विला पराभवाचा धक्का दिला, हा दिवसातील सर्वात मोठा निकाल ठरला. 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यविजेत्या क्विने एकवेळ 10-3 अशी उत्तम आघाडी प्राप्त केली होती. पण, नंतर जॉर्जने या सामन्याची सारी समीकरणे बदलून टाकली. पुढे उभयंतात 18-18 अशी एकवेळ बरोबरी होती. पण, जॉर्जने दडपण उत्तमरीत्या हाताळत पहिला गेम 21-18 असा जिंकला.
जॉर्जने पुढे दुसर्या गेममध्ये हाच धडाका कायम राखत प्रथम 6-0 व नंतर 11-0 अशी एकतर्फी आघाडी नोंदवली. जागतिक क्रमवारीत 59 व्या स्थानी असलेल्या जॉर्जला क्विविरुद्ध अनुभवाची उणीव भासणे साहजिक होते. पण, त्याने जिद्द न सोडता सातत्याने क्विला पेचात टाकले व अंतिमत: विजय मिळवण्यात देखील यशस्वी ठरला. जॉर्जने दिवसभरात 2 सामने जिंकले. दुसर्या लढतीत त्याने कोरियाच्या जिओनला देखील पराभूत केले.
महिला एकेरीत सिंधूला लीविरुद्ध पुन्हा एकदा झगडावे लागले. यानंतर होणार्या सिंगापूर ओपन व इंडोनेशिया ओपन स्पर्धेत सिंधूसाठी कठीण ड्रॉ मिळाला असून यामुळे या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी तिच्यासाठी धक्का देणारी ठरली आहे.
हेही वाचा;