गोव्यात आता एआय कॅमेर्‍यांची करडी नजर; बेशिस्त वाहन चालकांवर होणार कारवाई | पुढारी

गोव्यात आता एआय कॅमेर्‍यांची करडी नजर; बेशिस्त वाहन चालकांवर होणार कारवाई

पणजी ः पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी वाहतूक खाते विविध उपक्रम राबवत आहे. येत्या काळात राज्यातील ७० ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऑटोमेटिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. १ जूनपासून १४ ठिकाणी बसविलेले कॅमेरे कार्यन्वीत होतील व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना थेट दंड होईल, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पर्वरी येथील मंत्रालयात बुधवारी गुदिन्हो यांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणासाठी १४ स्पीडगन प्रदान केले. यावेळी वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर, पोलिस अधीक्षक धर्मेेश आंंगले व मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गुदिन्होे म्हणाले, वाहतूक खात्याने राज्यातील अपघात प्रवण जागा पाहिल्या असून अशा ७० जागी ऑटोमेटिक कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या ज्या १४ ठिकाणी असे कॅमेरे बसवले आहेत ते उद्यापासून कार्यन्वित होतील. या कॅमेर्‍यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना १४ स्पीडगन दिल्या गेल्या आहेत. यापूर्वी 4 अशा स्पीडगन होत्या. कॅमेरे व स्पीड गनच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण करणे व वाहतूक नियम भंग करणार्‍यांवर कारवाई करणे हे उद्देश असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

नियम पाळा, दंड टाळा

पोलिस विनाकारण वाहन चालकांना दंड करत नाहीत. जे नियमांचे उल्लंघन करतात त्यांनाच दंड होतो. उद्यापासून ऑटोमेटिक कॅमेर्‍यांद्वारे दंड होणार असल्याने तो टाळता येणार नाही. तो टाळण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे वाहतूक नियम पाळा, दंड टाळा, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले.

सरकारी जुनी वाहने भंगारात काढणार

केंद्र सरकारने 15 वर्षे जुनी झालेली वाहने भंगारात काढण्यासाठी धोरण जाहीर केले आहे. गोव्यामध्येही या धोरणानुसार, पंधरा वर्षे जुनी वाहने टप्प्याटप्प्याने मोडीत काढली जातील. पहिल्या टप्प्यात सरकारी जुनी वाहने भंगारात काढली येतील. सरकारी वाहनांसोबत जुन्या कदंबही भंगारात काढल्या जातील. त्याबदल्यात नवी वाहने व नव्या बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर खासगी जुनी वाहने भंगारात काढली जातील. जुनी वाहने ठेवण्यासाठी जागा अद्याप निश्चित केली नसल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

इलेक्ट्रिक वाहनांना पसंती द्या

राज्यातील नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास राज्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सेंटर स्थापन होतील. इलेक्ट्रिक वाहने वाढली की इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर आपोआप वाढतील. सध्या राज्यात 30 च्या आसपास चार्जिंग सेंटर आहेत. लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी केले.

हेही वाचंलत का?

Back to top button