Puneeth Rajkumar : ‘पॉवरस्टार’चे डोळे पाहत राहतील जग!

Puneeth Rajkumar
Puneeth Rajkumar
Published on
Updated on

कन्नड सिनेमाचे 'पॉवरस्टार' आणि लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचे हृदयघाताने निधन झाले. ते अवघ्या ४६ वर्षांचे होते. पुनीत राजकुमार यांचे पार्थिव बंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथे त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पुनीत राजकुमार हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले.

सकाळी पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करत होते. त्याचवेळी त्यांना छातीत दुखायला सुरू झाले. त्यानंतर त्यांना तातडीने विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या. त्यानंतर हृदयाघात झाल्याचे निदान करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हायअ‍ॅलर्ट जारी केला. बॉलीवूड सेलिब्रिटींसह दाक्षिणात्य अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला.

वडिलांप्रमाणे अभिनेता पुनीत यांनी नेत्रदान केले आहे. पुनीत यांचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते राजकुमार यांनी १९९४ मध्ये आपले संपूर्ण कुटुंब नेत्रदान करेल असा निर्णय घेतला होता. राजकुमार यांचा १२ एप्रिल २००६ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पुनीत यांना अप्पू आणि पॉवरस्टार नावाने ओळखले जात होते. अभिनेता चेतन कुमार अहिम्साने एक ट्विट केले आहे. डॉक्टरांनी पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण केली. जेव्हा मी अप्पू सरांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आत त्यांचे डोळे काढण्यासाठी डॉक्टरांची टीम आली होती. राजकुमार आणि निम्मा शिवन्ना यांनी नेत्रदान केले. त्याप्रमाणे अप्पू सर यांनाही नेत्रदान केले, असे चेतन कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुनीत यांना अप्पू आणि पॉवरस्टार नावाने त्यांना ओळखले जात होते. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. नेत्रदानासाठी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आत डोळे काढले जातात.

१९८० मध्ये वडील राजकुमार यांच्यासोबत पुनीत यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला. वडिलांचा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला. १९८५ मध्ये प्रदर्शित 'बेट्टद हुवू' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. अप्पू, पॉवरसह अनेक चित्रपट गाजले.

३० हून अधिक चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका केली. ते फिटनेससाठी प्रसिध्द होते. त्यांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. केएमएफ, विज खाते, बंगळूर मार्ग परिवहन महामंडळ अशा विविध संस्थांचे ते दूत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, मुली ध्रुती, वंदिता भाऊ आणि अभिनेते शिवराजकुमार, राघवेंद्र राजकुमार, बहिणी पूर्णिमा, लक्ष्मी असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले. त्यानंतर हळूहळू रुग्णालयाकडे जाणार्‍यांची गर्दी वाढू लागली. एका पाठोपाठ एक असे त्यांचे चाहते गर्दीने रुग्णालयाकडे जात होते. यामुळे सरकारने हाय अ‍ॅलर्ट घोषित केले. अंत्यदर्शनासाठी कंठीरवा स्टेडियमवर व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी लाठीमार केला. चाहत्यांना आवरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कसरत सुरु होती.

मोठे सामाजिक कार्य

केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही पुनीत यांचा सहभाग होता. २६ अनाथाश्रम, ४६ मोफत शाळा, १६ वृद्धाश्रम, १९ गोशाळांना ते नियमितपणे आर्थिक मदत करत होते. म्हैसूरमध्ये शक्तीधाम नावाची संस्था स्थापन केली असून तेथे मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली. जनतेत जागृती करणार्‍या व काही सरकारी जाहिरातींमध्ये त्यांनी विना मोबदला अभिनय केला होता. त्यांनी वडिलांप्रमाणेच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार रुग्णालयाने सोपस्कार पूर्ण केले.

आज अंत्यसंस्कार

पुनीत यांचे पार्थिव कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. रविवारी सकाळी त्यांच्यावर राजकुमार यांच्या समाधीच्या बाजूला सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या दोन मुली अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. त्या शनिवारी सायंकाळी परतणार आहेत. तोपर्यंत सर्वांना अंत्यदर्शन घेता येणार आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news