म्हणून… ‘ब्रिटिश झू’मध्ये ‘आर्डवार्क’चा जन्मोत्सव

म्हणून… ‘ब्रिटिश झू’मध्ये ‘आर्डवार्क’चा जन्मोत्सव
Published on
Updated on

लंडन : वृत्तसंस्था

ब्रिटनमध्ये चेस्टर प्राणीसंग्रहालयात 'आर्डवार्क' या 'आफ्रिकन सहारा' हे मूळ असलेल्या प्राण्याचे 'बाळ' जन्माला आले आहे. वाळवी आणि मुंग्या हे आवडते खाद्य असलेला हा प्राणी एखाद्या प्राणीसंग्रहालयात जन्माला आला, असा प्रसंग तब्बल 90 वर्षांनी घडला आहे! साहजिकच चेस्टर प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी जाम खूश आहेत.

आर्डवार्क हा प्राणी मूळचा आफ्रिकेतील सहारा वाळवंटीय प्रदेशातला. मुळात हा प्राणी प्राणीसंग्रहालयांतून पाहायला मिळतच नाही. त्यात चेस्टरच्या वाट्याला या प्राण्याची प्रसूती आली! चेस्टर तर आनंदलेच, चेशियरही आनंदले. नव्या पाहुण्याला बघण्यासाठी गर्दीही वाढली. कर्मचार्‍यांनी बाळाचे नावही भारीच ठेवले! केसाचा लवलेश नसलेले, कातडीवर सरकुत्यांचे जाळे असलेले आणि डोळ्यांच्या बाहुल्या सतत नाचवत असलेले हे बाळ पाहून कर्मचार्‍यांना आठवण झाली ती, 'हॅरी पॉटर'मधील डॉब्बी या पात्राची! झाले…! आर्डवार्क बाळाचे नाव मग डॉब्बीच ठेवण्यात आले.

आर्डवार्कचा जन्म 4 जानेवारी 2022 चा, पण तो 'मुलगा (नर)' आहे की 'मुलगी (मादी)' हे तब्बल महिना उलटल्यानंतर कळले. (आर्डवार्क या प्राण्यात हे असेच असते) आर्डवार्क कोण आहे, याबद्दल अवघ्या ब्रिटनमध्ये उत्सुकता होती. म्हणून शुक्रवारी जसे हे कळले तसे चेस्टर प्राणीसंग्रहालयाकडून 'ती मुलगी आहे', हे ट्विटरवरून सार्वजनिक करण्यात आले. गंमत अशी की, नाव ठेवले तेव्हा हे माहिती नव्हते… आता काय करावे, नाव तर ठेवले गेले पुरुषी.

मग ट्विटरवरून 'डी ओ डबल बी वाय' ऐवजी 'डी ओ डबल बी आय ई' असे 'स्पेलिंग' बदलण्याची सूचना केली आहे. एमेली हिच नावाच्या महिलेची ही सूचना आहे. या सूचनेचे चेस्टर प्राणीसंग्रहालयाने स्वागत केले. आर्डवार्कच्या आईकडूनच त्याला इजा होणे शक्य आहे म्हणून त्याला भरविण्याचे कामही कर्मचार्‍यांकडूनच सुरू आहे. ब्रिटनमधूनच नव्हे तर युरोपातील प्राणीप्रेमींमधून आर्डवार्कचा जन्म ही 'तुफानी' आनंदाची बातमी ठरली आहे.

आर्डवार्क प्राण्याबद्दल…

हा एक सस्तन प्राणी आहे. कान सशासारखे, कांगारूसारखे शेपूट, बदकासारखे पाय, डुकरासारखे तोंड असा हा आर्डवार्क कुठल्याही जनावराशी संबंधित मात्र नाही. फार लाजाळू आणि एकांतप्रिय आहे. स्वजातीयांतही तो विणीच्या हंगामात मिसळतो. आफ्रिकन आदिवासी धार्मिक अनुष्ठानांत त्याचे काही अवयव वापरतात. मांसही खातात. त्याची लांबी 43 ते 53 इंच, वजन 110 ते 180 पौंड असते. रात्रीच बाहेर पडतो. अस्थायी बिळ खणून राहतो.

आर्डवार्क सर्वभक्षी आहे. मुंग्या आणि वाळवी हे त्याचे आवडते खाद्य आहे. पण मिळाले नाही तर तो कुठलेही मांस, वनस्पती खाऊन गुजराण करू शकतो. एका रात्रीत तो 50 हजार वाळवी फस्त करू शकतो. मादी 7 महिने गर्भावस्थेत असते. एकावेळी एकच पिलू जन्माला घालते. सहा महिने पिलू आईसह राहते. नंतर स्वतंत्र होते.

युरोपात 66 आर्डवार्क

आर्डवार्क हा प्राणी मुळात प्राणीसंग्रहालयांतून क्वचितच आढळतो. संपूर्ण युरोप खंडातील सर्व प्राणीसंग्रहालयांत मिळून अवघे 66 आर्डवार्क आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news