

Donald Trump Jr Engagement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि बेटिना अँडरसन यांचा साखरपुडा झाला असून, ही माहिती स्वतः ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सुरू असलेल्या ख्रिसमस पार्टीदरम्यान दिली. ही घोषणा काल 15 डिसेंबर रोजी करण्यात आली. ट्रम्प ज्युनियर यांचे वय सध्या 47 वर्ष आहे. त्यांचे प्रवक्ते अँड्र्यू सुरबियन यांनीही या साखरपुड्याची अधिकृत माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचा हा तिसरा साखरपुडा आहे. त्यांनी 2004 मध्ये प्रथम व्हॅनेसा ट्रम्प यांना मागणी घातली होती. दोघांचा विवाह 2005 मध्ये फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे पार पडला. मात्र, तब्बल 13 वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
यानंतर ट्रम्प ज्युनियर यांनी किंबरली गिलफॉइल यांच्याशी लग्न केले होते. गिलफॉइल या रिपब्लिकन पक्षातील प्रभावी नेत्या मानल्या जातात. मात्र पुढे दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, 2024 पासून ट्रम्प ज्युनियर आणि बेटिना अँडरसन यांच्यातील जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात हे दोघे राजस्थानमधील उदयपूर येथे एका विवाहसोहळ्यासाठी आले होते. त्या कार्यक्रमात ते बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत नृत्य करतानाही दिसले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
बेटिना अँडरसन या एक प्रसिद्ध सोशलाइट, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. त्या अमेरिकेतील पाम बीच येथील एका नामांकित आणि प्रतिष्ठित कुटुंबातून येतात. त्यांचे वडील हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर हे अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील मोठं नाव होतं.
हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर यांनी अवघ्या 26 व्या वर्षी, म्हणजे 1970 साली, वर्थ अव्हेन्यू नॅशनल बँकेचे अध्यक्षपद स्वीकारून अमेरिकेतील सर्वात तरुण बँक अध्यक्ष होण्याचा मान मिळवला होता. ते केवळ उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर दानधर्म आणि सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. अमेरिकन रेड क्रॉससारख्या अनेक संस्थांना त्यांनी मोठी मदत केली होती आणि रेड क्रॉसच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत होते.
हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर यांचे 2013 मध्ये, वयाच्या 70 व्या वर्षी, अल्झायमर आजारामुळे निधन झाले. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि बेटिना अँडरसन यांच्या साखरपुड्यामुळे ट्रम्प कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या आगामी विवाहसोहळ्याकडे आता अमेरिकेतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.