

सीजफायर झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर
ट्रम्प यांच्या दाव्यावर अळीमिळी गुपचिळी
कंबोडियाने शांततेच्या मार्गान प्रश्न सोडवण्यावर दिला भर
Donald Trump Cambodia Thailand Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशियातील दोन देश थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्ध थांबवल्याची शेखी मिरवली होती. मात्र ट्रम्प यांचा सीज फायर केल्याचा दावा फारकाळ टिकला नाही. कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकतेच कंबोडियानं दावा केला की शनिवारी सकाळी थायलंडच्या सैन्यानं वादग्रस्त सीमावेर हल्ले केले. तर थायलंडनं उलट कंबोडियावरच आरोप करत आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला.
सध्याच्या घडीला थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादग्रस्त सीमेवरील सैन्य संघर्ष थांबत नाहीये. अशा परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायरचा केलेला दावा फेल गेला का अशी चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी या दोन देशाच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा केली असून ते सीजफायरसाठी तयार झाल्याचा दावा केला होता.
कंबोडियाच्या माहिती आणि सूचना मंत्रालयानं शनिवारी थायलंडच्या सैन्यानं सीमेवरील हल्ले बंद केले नसल्याचं सांगितलं. त्यांच्या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार थायलंड सेना अजूनही सीमेवर बॉम्बवर्षाव करत आहे. या हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर केला जात असल्याचा आरोप देखील कंबोडियानं केला.
यावर थायलंडनेही पलटवार करत कंबोडियावर गंभीर आरोप केले आहेत. थायलंडच्या सैन्याने कंबोडियाचा आरोप खोडून काढत कंबोडियानेच सतत आंतररराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार कंबोडिया सैन्यानं नागरी वस्त्यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी सीमा भागात भूसुरूंग देखील पेरून ठेवले आहेत असा दावा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं सांगितलं होतं. हे दोन्ही देश शुक्रवारी गोळीबार थांबवण्यास तयार झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.
मात्र ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काही तासातच दोन्ही देशांनी सीजफायन तोडल्याचे दिसून आले. या सीजफायर बाबत दोन्ही देशाच्या नेत्यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात ब्र देखील काढलेलं नाही. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीरूकुल यांनी कोणतेही सीजफायर झाले नसल्याचे स्पष्ट करत ट्रम्प यांनाच तोंडावर पाडले. याबाबत थायलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांनी शनिवारी सोशल मीडियावरून एक वक्तव्य प्रसिद्ध केलं. त्यात मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबत आधी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत मानेत यांनी कंबोडिया अजूनही वादावर शांततेच्या मार्गानं तोडगा काढू इच्छितो असं सांगितलं. त्यांनी कंबोडिया हा ऑक्टोबर महिन्यात मलेशियाची राजधानी क्वालालांपूर इथं झालेल्या करारानुसार वाद सोडवण्यास प्रतिबद्ध असल्याचं सांगितलं.