भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असणार्या तणावावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. भारत -पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम हा अमेरिकेने मध्यस्थी केल्याने झाला होता, असा दावा करणार्या ट्रम्प यांनी आता सर्व काही दोन्ही देशांवरच अवलंबून असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे.
एअर फोर्स वनवरून उड्डाण केल्यानंतर ट्रम्प यांनी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे बोलताना स्पष्ट केले की, पाकिस्तान आणि भारतामध्ये एक अतिशय धोकादायक संभाव्य युद्ध सुरू होते. कोणीही याबद्दल बोलत नाही. परंतु आता परिस्थिती ठीक आहे. अमेरिका भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार करार करणार आहे. मला याचा अभिमान आहे. आम्ही गोळ्यांऐवजी व्यापाराद्वारे संभाव्य अणुयुद्ध रोखू शकलो.
पाकिस्तानचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात अमेरिकेत येत आहेत. आम्ही भारतासोबतही करार करण्याच्या अगदी जवळ आहोत. भारत-अमेरिका २५ जूनपर्यंत अंतरिम व्यापार करारावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान जर एकमेकांशी युद्ध करणार असतील तर मला कोणाशीही करार करण्यात रस नाही. दोन्ही देश युद्ध करणार असतील आम्ही मध्यस्ती करणार नाही. तसेच दोन्ही देशांबरोबर कोणताही करार करणार नाही.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्काच्या घोषणेनंतर, भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात २५ जूनपर्यंत अंतरिम व्यापार करार होऊ शकतो. व्यापार चर्चेला गती देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल देखील गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये होते. या दरम्यान त्यांनी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांची दोनदा भेट घेतली.