पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कदाचित त्यांना (मागील बायडेन सरकार) भारतात दुसऱ्याचे सरकार स्थापन करायचे होते, असा गंभीर आरोप भारतीय निवडणुकीतील अमेरिकेच्या निधीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भारताला निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी दिल्या जाणार्या २१ दक्षलक्ष डॉलर्स निधीवर त्यांनी सवाल केले.
मियामी येथील एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारतातील मतदारांच्या संख्या वाढवण्यासाठी २.१ कोटी डॉलर्सच्या निधी दिला जात होता. भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्याला २१ दशलक्ष डॉलर्स देण्याची गरज का आहे?' मला वाटतं त्यांना ( ज्यो बायडेन प्रशासनाला) निवडणुकीत दुसऱ्या कोणालातरी निवडून आणायचं होतं. आपण भारत सरकारला याबद्दल सांगायला हवे. हे धक्कादायक आहे.'
एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने स्पष्ट केले होते की, जगभरातील देशांना निधी पुरवणारी अमेरिकन एजन्सी USAID द्वारे भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी २१ दक्षलक्ष डॉलर्स देण्यात आले आहेत. बुधवारीही ट्रम्प यांनी भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकेच्या निधीवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, 'आपण भारताला २१ दशलक्ष डॉलर्स का देत होतो?' त्याच्याकडे आधीच पुरेसे पैसे आहेत. ते सर्वात जास्त कर असलेले देश आहेत. त्यांचे दर खूप जास्त असल्याने आम्हाला आमचा माल त्यांच्या बाजारपेठेत पाठवणे कठीण आहे. मी भारताचा आणि त्याच्या पंतप्रधानांचा आदर करतो, पण भारतीय निवडणुकांसाठी २.१ कोटी रुपयांच्या निधीचा काय अर्थ आहे? इथे मतदानाची टक्केवारी कशी आहे?, असे सवालही त्यांनी केले होते.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सरकारचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यक्षमता विभागाची (DOGE) निर्मिती केली आहे. बांगलादेशमध्ये राजकीय स्थिरता मजबूत करण्याच्या नावाखाली अमेरिकन सरकार २९ दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत देत असल्याचेही कार्यक्षमता विभागाने म्हटले आहे. बांगलादेशमध्ये राजकीय स्थिरता मजबूत करण्याच्या नावाखाली अमेरिकेने निधी पुरवला, परंतु सध्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. बांगलादेशमधील शेख हसीना सरकार हटविण्यामागे अमेरिकेचे समर्थित डीप स्टेट असू शकते, असा आरोपही अमेरिकेवर होत आहे.