

US Iran Conflict Iran Air Force Commanders Meeting
तेहरान : मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. एकीककडे अमेरिका आखाती देशांमध्ये आपली लष्करी ताकद वाढवत आहे. तसेच इराणचे नेतृत्त्व बदलाबाबतही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर भाष्यही केले आहे. आता ट्रम्प यांच्या याच दहशतीमुळे इराणचे सर्वेसर्वा खामेनींनी मोडली ३७ वर्षांची परंपरा मोडित काढली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हवाई दलाच्या कमांडर्ससोबतची ८ फेब्रुवारीची आपली वार्षिक बैठक टाळली आहे. गेल्या ३७ वर्षांत ही परंपरा प्रथमच मोडली गेल्याचे वृत्त आहे. १९८९ मध्ये नेतृत्व स्वीकारल्यापासून खामेनी यांनी अगदी कोविड-१९ महामारीच्या काळातही ही परंपरा पाळली होती, असे 'इराण इंटरनॅशनल'च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
८ फेब्रुवारी १९७९ रोजी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या एका गटाने पहलवी राजवट उलथवून टाकण्यासाठी रुहोल्ला खोमेनी यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी या बैठकीचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या परंपरेला छेद देत खामेनी यांच्याऐवजी सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दुलरहीम मौसावी यांनी रविवारी हवाई दलाच्या कमांडर्सची भेट घेतली.
इराण आणि अमेरिकेतील तणाव कमालीचा वाढला आहे. आता इराणवर संभाव्य लष्करी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे खामेनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचे मानले जात आहे. इराणने अमेरिकेला वारंवार इशारा दिला आहे की, "जर अमेरिकेने यावेळी युद्ध सुरू केले, तर त्याचे पडसाद संपूर्ण प्रदेशात उमटतील." जून २०२५ मध्ये झालेल्या १२ दिवसांच्या इराण-इस्रायल युद्धाचा संदर्भ देत तेहरानने हा इशारा दिला आहे.
युद्धविराम झाला असला तरी, चर्चेच्या मुद्द्यांवरून इराण आणि अमेरिका यांच्यात अजूनही मतभेद आहेत. वॉशिंग्टनचा आग्रह आहे की चर्चेत इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याचा समावेश असावा, तर इराण केवळ अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा करण्यास तयार आहे. या वादातूनच ट्रम्प इराणवर हल्ला करण्याची आपली धमकी प्रत्यक्षात आणू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस अमेरिकेने आपली युद्धनौका 'यूएसएस अब्राहम लिंकन' अरबी समुद्रात तैनात केली आहे. तसेच, जॉर्डनमधील मुवाफक साल्टी एअर बेसवर डझनभर एफ-१५ फायटर जेट्स, एमक्यू-९ रिपर कॉम्बॅट ड्रोन आणि ए-१० सी थंडरबोल्ट विमाने दाखल झाली आहेत. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांनुसार, अमेरिकेची विनाशिका 'यूएसएस डेलबर्ट डी ब्लॅक' सुएझ कालव्याद्वारे लाल समुद्राकडे कूच करत असून आखाती प्रदेशात अमेरिकेची पाळत ठेवणारी विमाने सातत्याने घिरट्या घालत आहेत.