

इराणचे सर्वोच्च शिया धर्मगुरू ग्रँड अयातुल्ला नासेर मकारिम शिराजी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात फतवा जारी केला आहे. दोन्ही नेते ‘अल्लाहचे शत्रू’ आहेत. जगभरातील मुस्लिमांना एकत्र येऊन या नेत्यांना इराणवरील हल्ल्याचा पश्चात्ताप करण्यास भाग पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
इस्लामिक कायद्यानुसार, ‘फतवा’ म्हणजे कायद्याचे स्पष्टीकरण. मकारिम यांनी फतव्यात म्हटले आहे की, इराणच्या सर्वोच्च नेत्याला इजा पोहोचवण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करेल, तो ‘मोहरिब’ म्हणजेच युद्धखोर गुन्हेगार मानला जाईल.
इराणने इस्रायलसोबतच्या युद्धविरामावर शंका व्यक्त केली आहे. इराणचे लष्करप्रमुख अब्दोलरहीम मुसवी यांनी रविवारी (दि. २९ जून) सौदीचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. "आम्हाला इस्रायल सोबतच्या युद्धविरामावर विश्वास नाही. पुन्हा हल्ला झाल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ," असे मुसवी यावेळीम्हणाले. दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवस चाललेल्या संघर्षानंतर २४ जून रोजी युद्धविराम झाला, ज्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. या संघर्षात इराणचे ६१० आणि इस्रायलचे २८ नागरिक ठार झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (एआयईए) रविवारी (दि. २९ जून) सांगितले की, इराण काही महिन्यांत आपला अणुऊर्जा कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतो. अमेरिकेने बी-२ बॉम्बरने हल्ला करून इराणचे फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अणुप्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. मात्र, 'एआयईए'चे संचालक राफेल ग्रॉसी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इराणच्या काही अणुऊर्जा सुविधा अजूनही सुरक्षित आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना मरण्यापासून मीर वाचवले, अन्यथा त्यांचा मृत्यू अत्यंत वाईट झाला असता, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांना इराणचे खामेनी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे थांबवण्याचा इशारा दिला आहे. अराघची यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ट्रम्प यांची ही वृत्ती केवळ खामेनी यांचाच नव्हे, तर त्यांच्या लाखो समर्थकांचाही अपमान करणारी आहे. ट्रम्प यांना इराणसोबत कोणताही करार करायचा असेल, तर त्यांना आपली भाषा बदलावी लागेल."