

वॉशिंग्टन : नववर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे माईक फिंक आणि जेना कार्डमन हे दोन अंतराळवीर 8 व 15 जानेवारी रोजी स्पेस वॉक करणार आहेत. अंतराळ स्थानकासाठी दोन नवे सोलर पॉवर (सौरऊर्जा) चॅनल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर सोपविण्यात आली असून, या स्थानकाला अखंड ऊर्जापुरवठा उपलब्ध करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
यातील पहिला स्पेस वॉक 8 जानेवारीला केला जाणार आहे. या दोघांकडून तयार केले जाणारे पॉवर चॅनल अंतराळ स्थानकावर बसविण्यात येणार आहेत. स्पेस स्टेशनच्या सुरक्षिततेतही या चॅनलची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे, जेना कार्डमन यांचा हा पहिलाच स्पेस वॉक असेल. फिंक हे तब्बल दहाव्यांदा स्पेस वॉक करणार असून, ‘नासा’च्या इतिहासात सर्वाधिक वेळा स्पेस वॉक करणारे ते तिसरे अंतराळवीर ठरणार आहेत. स्पेस वॉक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते.
हे दोन्ही अंतराळवीर 15 जानेवारी रोजी दुसरा स्पेस वॉक करणार आहेत. याप्रसंगी अंतराळ स्थानकावरील कॅमेऱ्याची दिशा बदलण्यात येणार आहे. तसेच, अन्य तांत्रिक बदल केले जातील, असे ‘नासा’च्या सूत्रांनी सांगितले. स्पेस वॉक मोहिमेची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे. तसेच, खगोल अभ्यासकांना सोशल मीडियावर यासंदर्भात प्रश्न विचारण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
या दोन्ही स्पेस वॉकनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातर्फे केल्या जाणाऱ्या स्पेस वॉकची संख्या 279 होईल. अर्थात, नव्या वर्षातील हे पहिलेच स्पेस वॉक ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची सुरक्षितता, मजबुती आणि भविष्यातील मोहिमांसाठी त्यास सज्ज ठेवणे याकामी या दोन्ही मोहिमा मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास ‘नासा’च्या सूत्रांनी व्यक्त केला.
अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती रशियाचे ॲलेक्सी लिओनोव्ह होते. त्यांनी 18 मार्च 1965 रोजी पहिला स्पेस वॉक केला होता. हा स्पेस वॉक 10 मिनिटांचा होता. त्याच वर्षी जूनमध्ये एड व्हाईट अंतराळामध्ये चालणारी पहिली अमेरिकन व्यक्ती बनले होते. व्हाईट यांनी एकूण 23 मिनिटे स्पेस वॉक केला होता. आता अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबाहेर स्पेस वॉक करतात. हा स्पेस वॉक टास्कनुसार पाच ते आठ तास चालत असल्याची माहिती मिळते.