

मुंबई : चंदन शिरवाळे
मुंबईकरांच्या गरजा विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ, पाच वर्षात पाचशे किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्याचे वचन दिले आहे. तसेच शहरातील सर्व फ्लायओव्हर, रस्ते आणि पुलांचे आधुनिकीकरण करण्याची ग्वाही आपल्या जाहीरनाम्यातून दिली आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा सदर निवडणूक जाहीरनामा 7 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते व निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात येणार आहे.
महानगरपालिकांच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. या शाळांचे आधुनिकीकरण करण्यासोबतच डिजिटल क्लासरूम आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत पौष्टिक आहार योजना राबविली जाणार आहे. तडेच स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशन केले जाईल.
राष्ट्रवादीची आश्वासने
चोवीस तास स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा.
घनकचरा व्यवस्थापनासाठी झीरो वेस्ट धोरण.
नाले आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान.
प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र.
मुंबईत 10 लाख वृक्षलागवड. उद्यानांचा विस्तार.
सर्व फुटपाथ करणार अतिक्रमणमुक्त.
मुंबईत ऑलिंपिक दर्जाचे स्टेडियम आणि युवा क्लब.
महिला उद्योजकांसाठी मोफत प्रशिक्षण आणि कर्ज योजना.