

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस प्रणित मुंबई विकास आघाडी स्थापन केली असून त्यांचा निवडणूक जाहीरनामा मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील प्रदूषणासाठी सरकारला जबाबदार धरले असून मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत असून राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे.
काँग्रेस सत्तेवर आली तर मुंबईकरांना प्रदूषणमुक्त हवेत श्वास घेता येईल, असा दावा मुंबई काँग्रेसने जाहीरनाम्यात केला आहे. तसेच सर्व मुंबईकरांना 20 टक्के मोफत पाणीपुरवठा केला जाईल. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी प्रत्येकी पाच टक्के बजेट महापालिका अर्थसंकल्पात राखीव ठेवले जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
मुंबईकरांना युनिव्हर्सल मोफत हेल्थ कार्ड देण्यात येईल. त्या अंतर्गत आवश्यक औषधे मोफत दिली जातील. मुंबईला खड्डेमुक्त करण्यात येईल आणि रस्त्यांच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुंबई काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. मुंबई फेरीवाला झोन या 2014 च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. स्मार्ट मीटरच्या नांवाखाली सुरु असलेली वीज ग्राहकांची फसवणूक थांबविण्यात येईल. मुंबईला जपर वायरमुक्त शहर केले जाईल. मुंबई उपनगरातील वीज पुरवठा पुन्हा बेस्टकडे आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू करणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण बजेटपैकी 5 टक्के निधी (नवबौद्ध) प्रवर्गासाठी राखीव ठेवणार.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण बजेटपैकी 5 टक्के निधी अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवणार.
दरवर्षीची 8 टक्के पाणी दरवाढ रद्द करणार.
पात्र गृहनिर्माण संस्थांना मोफत बोअरवेल सुविधा देणार.
समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी डीसॅलिनेशन प्रकल्प राबवणार.
महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयाचे खासगीकरण केले जाणार नाही.
बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करणार.
शाळांमध्ये संगणक वर्ग, स्मार्ट क्लासरूम-
विद्यार्थी संख्येनुसार प्रशिक्षित व पात्र शिक्षकांची नियुक्ती करणार.
मुंबई ः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस आणि मित्रपक्षांचा जाहीरनामा मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. यावेळी आमदार अमिन पटेल, आमदार अस्लम शेख, सचिन सावंत यांच्यासह वंचित, राष्ट्रीय समाज पक्ष, गवई गट या मित्रपक्षांचे नेते हजर होते.