

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुख्य रस्ते वरून चांगले असले तरी अंतर्गत रस्ते मात्र खराब आहेत. त्यामुळे नवी मुंबईत वरून कीर्तन आतून तमाशा असल्याचा खोचक टोला राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांना लगावला. नवी मुंबईत परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऐरोली विधानसभा मतदार संघात प्रचार रॅली काढण्यात आली होती. दिघा परिसरातील विटावा येथील प्रवेशद्वारापासून मंगळवारी 6 रोजी या रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले व शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते. दिघापासून सुरू झालेला रोड शो तुर्भे येथे संपवण्यात आला. या रोड शो दरम्यान नवी मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागात एकनाथ शिंदे यांनी थांबून उपस्थित समुदायाला संबोधित केले, नगरविकास खाते माझ्याकडे आहे.
त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. एमआयडीसी आणि इतर भूखंडांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचा एस. आर. एच्या माध्यमातून पुनर्विकास करू. तसेच शहरी भागामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.