

मुंबई : मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत होऊन आता तीन महिने उलटले तरी या नव्या स्थानकांवर अद्याप नेटवर्क उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे जमिनीखाली 20 फूट खोलवर प्रवाशांना फोनचा वापरच करता येत नाही.
मेट्रो 3 मार्गिका भुयारी असल्याने येथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील स्थानकांवर एअरटेल, वोडाफोन आणि जिओचे नेटवर्क उपलब्ध होते. मात्र नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त शुल्काची आकारणी केली जात असल्याचे कारण सांगून या कंपन्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर वोडाफोनची मनधरणी करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र जिओ आणि एअरटेलचे नेटवर्क अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.
वरळी ते कफ परेड या उर्वरित टप्प्यातील स्थानकांतून 8 ऑक्टोबर 2025पासून मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र या नव्या स्थानकांत अद्याप नेटवर्क उपलब्ध होऊ शकलेले नाही. वोडाफोननेही आपली नेटवर्क सुविधा या स्थानकांत दिलेली नाही. त्यामुळे सध्या या स्थानकांत शिरल्यावर मोबाईलचे नेटवर्क जाते. इंटरनेट आधारित तिकीट प्रणालीत अडथळे येतात. एमएमआरसीएलने मेट्रो कनेक्ट ॲपच्या माध्यमातून मोफत वाय-फाय उपलब्ध करून दिले. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून तिकीट काढता येते. मात्र हे ॲप न वापरणाऱ्या प्रवाशांना मोबाईल वापरताच येत नाही.
प्रवाशांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएमआरसीएलने भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल या कंपनीशी बोलणी सुरू केली होती. मात्र अद्याप त्याबाबतही स्पष्टता नाही. आरे ते कफ परेड हे अंतर जवळपास एक तासाचे आहे. या काळात प्रवाशांना कुणाशीही फोनवर बोलता येत नाही किंवा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करता येत नाही.