

US Strikes Venezuela: व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये शनिवारी पहाटे जोरदार स्फोट झाले. शहरातील विविध भागांत एकामागून एक मोठ्या आवाजाचे धमाके ऐकू आले. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आणि अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले.
स्थानिक वेळेनुसार पहिला स्फोट रात्री साधारण 1.50 वाजता झाला. त्यानंतर काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. आकाशात विमानांसारखे आवाज ऐकू येत होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडीओंमध्ये रात्रीच्या अंधारात धुराचे मोठे लोट दिसत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात सतत सायरन वाजत होते आणि लष्करी जवान पहारा देत होते.
या स्फोटांमागे अमेरिकेचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सुरुवातीला सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, नंतर व्हेनेझुएलाच्या सरकारने निवेदन जारी करत अमेरिकेवर हल्ल्याचा आरोप केला.
सरकारी निवेदनानुसार, राजधानी कराकससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या राज्यांमध्ये नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. ही कारवाई म्हणजे थेट लष्करी आक्रमण असल्याचं सरकारने म्हटलं आहे. “अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,” असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या विमानांसाठी व्हेनेझुएलाचं संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केल्याचं सांगितलं जात आहे. याआधीही अमेरिका व्हेनेझुएलामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाईचे संकेत देत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएलाविरोधात थेट लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सध्या कराकसमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असून लष्करी हालचाली वाढल्या आहेत. स्फोटांचं नेमकं कारण काय, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजधानीसह संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे.