

Marathi Sahitya Sammelan 2026 Vinod Kulkarni Attack
सातारा : मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.३) घडला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्याच्या हातात कोयत्यासारखी शस्त्रं होती, असा गंभीर आरोप विनोद कुलकर्णींनी पुढारी न्यूजशी बोलताना केला. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव संदीप जाधव असे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनोद कुलकर्णी यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना सांगितले की, "मी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन कार्यक्रम करून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत होतो. यावेळी अज्ञात व्यक्तीने माझ्या डोळ्यात काळा पदार्थ टाकला. त्यांच्याकडे कोयत्यासारखी शस्त्रही होती. तुला संपवतो अशी भाषाही यावेळी हल्लेखोराने वापरली. यावेळी काळा काही तरी डोळ्यात गेल्याने मला काहीही दिसले नाही. उपचार घेऊन मी पुन्हा संमेलनस्थळी दाखल झालो आहे."
हल्ला केला की कोणी करायला लावला आहे हे माहिती नाही
"मी सरकारविरोधात, हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. आमच्या सरकार व वेगवेगळ्या संघटनांविरोधात मराठी भाषेसाठी लढाया सुरू आहेत. कोणत्या कारणातून माझ्यावर हल्ला झाला हे मला समजून आलेले नाही," असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. हल्ला केला की कोणी करायला लावला आहे हे माहिती नाही. पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करून मला न्याय देतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
अत्यंत दुर्दैवी प्रकार : नरेंद्र पाठक
साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नरेंद्र पाठक यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितले की, "विनोद कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट केले. साहित्य चळवळीमध्ये विनोद कुलकर्णी यांचे योगदान मोठे आहे. अशा प्रकारचे साहित्य संमेलनाचे कार्यक्रम घेणे सोपे नाही. अशा प्रकारचा हल्ला होणे दुर्दैवी आहे."