

वेस्ट पाम बीच (फ्लोरिडा); वृत्तसंस्था : नायजेरियात निरपराध ख्रिश्चन नागरिकांवर सातत्याने होणार्या हल्ल्यांच्या बदला घेण्यासाठी अमेरिकेने नायजेरियामधील इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अनेक वर्षे हे दहशतवादी ख्रिश्चन नागरिकांची निर्घृण हत्या करत होते. त्यांना आधी इशारा दिला होता, आता त्याची किंमत त्यांना मोजावी लागली असे ट्रम्प यांनी सांगितले. सोबोटो राज्यात हा हल्ला करण्यात आला असून, त्यात आयएसआयएसचे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
कमांडर-इन-चीफ या नात्याने दिलेल्या आदेशानुसार अमेरिकेने उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांवर अत्यंत शक्तिशाली आणि घातक हल्ला केल्याची माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. या हल्ल्याची अचूक पद्धत किंवा नुकसान किती झाले, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली तरी, अमेरिकन अफ्रिका कमांड यांनी एक्स पोस्ट वर दिलेल्या माहितीनुसार नायजेरियन सरकारच्या विनंतीवरून सोबोटो राज्यात हा हल्ला करण्यात आला असून, त्यात आयएसआयएसचे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही आठवड्यांत नायजेरियातील ख्रिश्चनांवरील हल्ल्यांबाबत नायजेरियन सरकारवर उघडपणे टीका केली होती. याआधीच ट्रम्प यांनी पेंटागॉनला संभाव्य लष्करी कारवाईचे नियोजन करण्याचे आदेश दिल्याचे जाहीर केले होते.
नायजेरियात ख्रिश्चन - मुस्लिम लोकसंख्या समप्रमाणात
सुमारे 22 कोटी लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकसंख्या जवळपास समान प्रमाणात आहे. देशात दीर्घकाळापासून अस्थिरता असून, अतिरेकी गट कट्टर इस्लामी कायदे लागू करण्यासाठी हिंसाचार करत आहेत.