

Indore Water Contamination News: इंदूरमधील भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी पिल्याने आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. हा मुलगा सुनील साहू आणि त्यांच्या पत्नीच्या आयुष्यात दहा वर्षांनंतर आला होता. अनेक नवस, प्रार्थना आणि उपचारांनंतर त्यांना मुलगा झाला होता. पण दूषित पाण्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला.
सुनील साहू सांगतात, “मुलाला जुलाब आणि ताप होता. डॉक्टरांकडे नेलं, औषधं दिली. दोन दिवस त्याला बरं वाटत होतं. पण रात्री अचानक ताप वाढला, उलटी झाली आणि काही कळायच्या आत तो आमच्या डोळ्यांसमोर निघून गेला.”
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण निरोगी होते. 31 वर्षांच्या उमा कोरी यांना कोणताही आजार नव्हता. त्या पती बिहारी कोरी यांच्यासोबत छोट्या भाड्याच्या घरात राहत होत्या. रविवारी संध्याकाळी बिहारी कामावरून घरी येताना पत्नीकरता जलेबी घेऊन आले. पण ती रात्र त्यांच्या संसाराची शेवटची ठरली.
पहाटे तीनच्या सुमारास उमा यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. सुरुवातीला दोघांनाही वाटलं फूड पॉयझन झालं असेल. पण काही तासांतच परिस्थिती गंभीर झाली. उलट्या थांबत नव्हत्या, अंगात पाणी राहत नव्हतं. सकाळी अकराच्या सुमारास उमा बेशुद्ध पडल्या. घरच्यांनी त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेलं, पण तिथं पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना पाहून बिहारींचे डोळे पाणावले.
मंजुळा वाधे यांनी सोमवारी रात्री कुटुंबासाठी जेवण बनवलं होतं. मध्यरात्री त्यांना उलट्या सुरू झाल्या, नंतर जुलाबही झाले. पती दिगंबर वाधे पूर्ण रात्र त्यांच्या शेजारी बसून होते. सकाळी तब्बेत अधिकच बिघडली. तातडीने एमवाय रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दिगंबर म्हणाले, “आमच्या भागात अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत आहे. ही चूक आमची नाही, प्रशासनाची आहे.”
50 वर्षांच्या सीमा प्रजापत यांना कोणताही आजार नव्हता. पहाटे चारच्या सुमारास त्यांना उलट्या सुरू झाल्या. काही तासांतच त्यांची अवस्था इतकी बिघडली की कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं. पाच तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला.
70 वर्षांच्या उर्मिला यादव यांना उलटी आणि जुलाब झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एक दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, पण रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सुनेने सांगितलं, “नळाचं पाणी पिल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला होता. पाण्याची चव विचित्र आहे, असं त्या वारंवार सांगायच्या.”
75 वर्षांचे नंदलाल यांनाही जीव गमवावा लागला. सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगण्यात आलं, पण नंतर डॉक्टरांनी दूषित पाण्याचा परिणाम झाल्याचं सांगितलं. “आम्हाला कधी वाटलंच नाही की पाणी जीव घेईल,” असं त्यांचा मुलगा सांगतो.
भागीरथपुरा परिसरात गेल्या एक आठवड्यापासून नळाचं पाणी दूषित येत असल्याच्या तक्रारी होत होत्या. पण त्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेतली नाही.