अभिजित कुंटे : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच बुद्धिबळपटू

अभिजित कुंटे : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच बुद्धिबळपटू
Published on
Updated on

मिलिंद ढमढेरे

नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यास यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच बुद्धिबळपटू आहे. एवढे मोठे यश मिळूनही त्याचे पाय जमिनीवरच असतात. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत.

मेजर ध्यानचंद यांचे नाव डोळ्यासमोर येताच आपल्याला हिंदुस्थानी संघासाठी केवळ आणि केवळ सुवर्णपदक जिंकण्यासाठी लढणारे हॉकीचे जादूगार दिसतात. अशा महान खेळाडूंपासून प्रेरणा घेत सतत खेळ आणि खेळाडूंच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत काही खेळाडू प्रयत्न करीत असतात. पुण्याचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याची अशाच खेळाडूंमध्ये गणना केली जाते. आतापर्यंत तो आणि त्याच्या कुटुंबीयांनी बुद्धिबळाच्या विकासाकरिता केलेले कार्य खरोखरीच अतुलनीय आहे.

ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक, आशियाई सांघिक स्पर्धेमध्ये सात पदके, आशियाई वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद, चार वेळा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, जागतिक अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग अशी भरगच्च कामगिरी खेळाडू म्हणून अभिजित याने केली आहे.

पण त्याचबरोबर भारतीय संघांबरोबर प्रशिक्षक व व्यवस्थापक, केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावरील खेळाडूंनी ज्या स्पर्धेची दखल घेतली अशा महाराष्ट्र लीग स्पर्धांचा प्रवर्तक, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या संभाव्य गुणवान व होतकरू खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या लक्ष्य फाऊंडेशनचा संस्थापक या भूमिकांमध्येही अभिजित याने आपल्या संघटन शैलीचा ठसा उमटविला आहे. त्यामुळेच की काय, त्याला यंदा संघटकांसाठी असलेल्या ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच बुद्धिबळपटू आहे. एवढे मोठे यश मिळूनही त्याचे पाय जमिनीवरच असतात. सदैव हसतमुख आणि इतरांसाठी मदतीला तत्पर असतो.

अभिजितची बहीण मृणालिनी ही मोहन फडके सरांकडे बुद्धिबळ शिकायला जात असे. तिच्याबरोबर सोबत म्हणून अभिजित जायचा. खरं तर त्याला क्रिकेट व अन्य खेळांची आवड होती. मात्र मृणालिनीबरोबर त्यालाही बुद्धिबळाची विलक्षण ओढ निर्माण झाली. पाहता पाहता या भावंडांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत पुणे शहराचा नावलौकिक उंचावला. त्या वेळी बुद्धिबळाला फारशी प्रसिद्धी आणि पुरस्कर्तेही नव्हते.

या भावंडांचे वडील प्रकाश कुंटे यांनी आपल्या मुलांच्या प्रत्येक यशस्वी कामगिरीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळत होते. आपल्या मुलांच्या प्रसिद्धीपेक्षाही पुण्यातील बुद्धिबळाचा प्रसार आणि प्रचार कसा वाढेल, हेच ध्येय त्यांनी सतत डोळ्यासमोर ठेवले होते. अभिजित हा चांगला यश मिळवीत आहे आणि त्यालाही बुद्धिबळात उज्ज्वल भवितव्य आहे, हे ओळखून आशियाई विजेतेपद मिळविल्यानंतर मृणालिनी हिने नोकरी आणि नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित केले.

प्रकाश कुंटे यांनी स्वतःच्या मुलांच्या बुद्धिबळ विकासाबरोबरच पुणे शहर आणि शहराच्या बाहेरील उदयोन्मुख खेळाडूंना कसे प्रोत्साहन मिळेल, याचाच सतत विचार केला आहे. सुरुवातीच्या काळात बुद्धिबळ खेळाडूंना लॅपटॉप घेणे सहजासहजी परवडत नसे, हे लक्षात घेऊनच कुंटे काकांनी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टची स्थापन केली. त्याद्वारे उदयोन्मुख व होतकरू खेळाडूंना लॅपटॉप, बुद्धिबळाची पुस्तके, दरमहा आर्थिक शिष्यवृत्ती देण्याची योजना अंमलात आणली.

एवढेच नव्हे, तर या खेळाडूंना प्रसिद्धी देण्यासाठीही त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. सुदैवाने अभिजीत आणि मृणालिनी या भावंडांनीही पालकांच्या या कार्यास नेहमीच हातभार लावला आहे. त्यांच्या जागी दुसरी कोणी भावंडे असती तर स्वतःच्या मुलांऐवजी इतर खेळाडूंना कशाला प्रोत्साहन देता, अशी तक्रारही आपल्या वडिलांकडे केली असती.

बुद्धिबळातील खेळाडूंना परराज्य किंवा प्रदेशांमधील खेळाडूंबरोबर डाव खेळण्याची संधी मिळावी याद़ृष्टीने बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट तर्फे स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे पुण्यातील खेळाडूंना अन्य खेळाडूंबरोबर अनुभव घेण्याची संधी पुणे शहरातच उपलब्ध झाली आहे. एवढेच नव्हे, तर पुणे आणि महाराष्ट्रातील अन्य गुणवान खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याचीही संधी या ट्रस्टद्वारे वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशा प्रत्येक उपक्रमात कुंटे कुटुंबीय आपल्या घरचेच कार्य आहे, असे म्हणून अक्षरशः दिवसरात्र कष्ट घेत असतात. अभिजितकडून मार्गदर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरचेही अनेक खेळाडू येत असतात. त्यातील काही खेळाडू अभिजितच्या घरीच मुक्कामाला असतात. अभिजितचे आई-वडीलही या खेळाडूंचा आनंदाने सांभाळ करीत असतात. जणू काही कुंटे यांचे घर म्हणजे बुद्धिबळाचे माहेरघरच आहे.

बुद्धिबळ हा काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील क्रीडा प्रकार नाही. बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्वतंत्र स्पर्धा असते. मात्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आर्थिक सुविधा व अन्य विविध कारणांमुळे फारसे यश मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर अभिजित याने समविचारी क्रीडा संघटकांच्या मदतीने लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना केली.

या फाऊंडेशनद्वारे सब ज्युनिअरपासून वरिष्ठ गटापर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंना दरमहा आर्थिक शिष्यवृत्ती देण्याबरोबरच चांगले प्रशिक्षक, फिजिओ, मसाजिस्ट, क्रीडा मानसतज्ज्ञ, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ, परदेशातील स्पर्धांमधील सहभाग आदी अनेक सुविधा दिल्या जात असतात. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमधील उदयोन्मुख खेळाडूंची निवड करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केलेली आहे. सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्याबरोबरच या खेळाडूंच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेण्याबाबत अभिजित आणि त्याचे सहकारी सतर्क असतात.

आयपीएल स्पर्धेद्वारे खेळाडू आणि प्रेक्षकांनाही आकर्षिले जाते. हे लक्षात घेऊनच अभिजितने अन्य संघटनांच्या मदतीने महाराष्ट्र चेस लीग ही व्यावसायिक स्तरावरील स्पर्धा आयोजित करीत देशातील खेळाडूंना एकत्र पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध करून दिली. ही स्पर्धा म्हणजे खर्‍या अर्थाने बुद्धिबळाचा आनंद घेण्याची पर्वणीच ठरली होती.

क्रिकेटमध्ये नवोदित खेळाडूंसाठी सचिन तेंडुलकर जसा आराध्यदैवत असतो, तसाच बुद्धिबळ खेळाडूंसाठी पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणारा विश्वनाथन आनंद हा आराध्य दैवतासारखा असतो. महाराष्ट्र चेस लीगद्वारे या महान खेळाडूबरोबर संवाद साधण्याची संधी पुण्याच्या बुद्धिबळपटूंना मिळाली होती.

अभिजित कुंटे हा स्वतः एका पेट्रोलियम कंपनीत मोठ्या पदावर आहे. पेट्रोलियम महामंडळातर्फे बुद्धिबळपटूंना नोकरी मिळवून देण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अनेक गुणवान खेळाडूंच्या भविष्यातील आर्थिक चिंता मिटली आहे. जर आर्थिकद़ृष्ट्या कोणतीही चिंता नसेल तर खेळाडूंची कामगिरी आपोआप अव्वल दर्जाची होते.

हे लक्षात घेऊन अभिजित याने गुणी खेळाडूंची आर्थिक चिंता कमी करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. अभिजित याला खेळाडू म्हणून अजूनही भरपूर संधी उपलब्ध आहेत; मात्र महाराष्ट्रातील नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यानेही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news