मुंबई : ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार | पुढारी

मुंबई : ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : डेल्टा व्हेरियंटपेक्षा प्रचंड गतीने संसर्ग करणार्‍या ओमिक्रान या नव्या कोरोना विषाणूचे संकट जगावर घोंघावू लागताच महाराष्ट्र सतर्क झाला आहे. लसीकरणाचे नियम आणखी कडक करतानाच काही निर्बंध पुन्हा येऊ घातले असून रविवारी राज्यपातळीवर होणार्‍या प्रशासकीय बैठकीत याबद्दल निर्णय अपेक्षित आहेत. मुंबई महापालिकेनेही या नव्या संकटाचा सामना करण्याची तयारी केली असून, ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात 1 डिसेंबरपासून सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. आमची याला नाहरकत आहे. कारण कोरोनाचा आफ्रिकेत नवा विषाणू आढळला म्हणजे लगेच त्याचा महाराष्ट्रात परिणाम होईल असे नाही. त्यामुळे शाळा सुरू करायला आमची हरकत नाही. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार्‍या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ही प्रशासनाची बैठक घेतील. आरोग्य खात्याचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित असतील. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांना 72 तासांचा आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्‍त तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांनी महापालिकेने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मुंबई विमानतळावर विदेशातून येणार्‍या प्रवाशांना विलगीकरण सक्‍तीचे करण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलाच तर कोरोना उपचार केंद्रांमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. मुंबईत आजघडीला एकही इमारत सील नाही. कोरोना मुक्‍तीकडे वाटचाल करणार्‍या मुंबईत ओमिक्रॉनचे संकट येऊ नये आणि आलेच तर ते वाढू नये म्हणून ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार असल्याचे काकाणी म्हणाले.

जिनोम सिक्वेन्सिंगचा निर्णय

मुंबईत कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आफ्रिकेतून येणार्‍या प्रवाशांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट) करण्यावर पालिका भर देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नाताळ सणानिमित्त परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे पालिका प्रशासनाकडून आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे.

दवाखाने पुन्हा सज्ज

मुंबई महापालिकेची वैद्यकीय सेवा सुविधा पुन्हा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नव्या कोरोना व्हेरियंटचा मुंबई शहरात पहिला होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे विमानतळावर आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांची टीम तैनात करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांचे हॉटेलमध्ये की महापालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये विलगीकरण करायचे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

सध्याच्या घडीला मुंबई विमानतळावर 25 ते 28 आंतरराष्ट्रीय विमाने येतात. अरब देश, यूएस आणि फ्रान्स या देशातून ही विमाने येतात. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईकरीता थेट विमानसेवा सध्या सुरू नाही. दुबई, इंग्लंडमार्गे दिवसाला किमान 5 ते 6 विमाने मुंबईत येतात.
प्रवाशांची यादी पालिकेकडे

मुंबईत हा नवा विषाणू विमानतळावरूनच येऊ शकतो हे स्पष्ट असल्याने अतिधोकादायक 14 देशांतून येणार्‍या प्रवाशांची यादी विमानतळांकडून नियमित घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहितीही सर्व महापालिकांनी आपल्याकडे ठेवावी, असे ते म्हणाले.

आफ्रिकेतून भारतात आलेले दोघे पॉझिटिव्ह

बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूला परतलेले कर्नाटकमधील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दोघांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी दोघांचेही नमुने जिनोम सिक्‍वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रिपोर्टकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ओमिक्रॉन भारतात दाखल झाल्याचे स्पष्ट होईल.

Back to top button