वॉशिंग्टन : चंद्रावर 2,38,855 मैलांचा प्रवास करून पोहोचणे हे केवळ निम्मे यश आहे. वैज्ञानिकांचे लक्ष्य केवळ चांद्रभूमीवर पोहोचणे हे नसून तिथे मानवी उपस्थितीला कायम राखणे हे आहे. त्यासाठी अंतराळवीरांना चांद्रभूमीवर वेगवेगळी साधनसामग्री निर्माण करण्याची गरज आहे. भविष्यात चंद्रावर पेट्रोल आणि स्टीलही बनवले जाईल असा विश्वास संशोधकांना वाटतो.
वैज्ञानिकांनी अलीकडेच चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर कार्बन डायऑक्साईड कोल्ड ट्रॅपची पुष्टी केली आहे. त्याचा वापर इंधन विकसित करण्याबरोबरच जैवसामग्री आणि स्टीलसारखी उत्पादने बनवण्यासाठीही होऊ शकतो. प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ वैज्ञानिक नॉर्बर्ट शॉर्गहोफर यांनी सांगितले की कार्बन हा एक महत्त्वाचा घटक आहे. चंद्रावर केवळ कार्बन डायऑक्साईड उपलब्धच आहे असे नाही तर त्याचे तिथे मुबलक प्रमाणही आहे हे विशेष.
मात्र, चंद्राच्या थंड वातावरणातून हा कार्बन बाहेर काढण्याचे तंत्र अद्याप विकसित करण्यात आलेले नाही. मात्र, पृथ्वीवरील खनन साधनसामग्रीप्रमाणेच असेल. चंद्राच्या कायमस्वरूपी अंधारात असलेल्या व अतिथंड भागात यासाठी काम करणे हे अत्यंत आव्हानात्मकच असेल.
मात्र, तरीही अशा वस्तू पृथ्वीवरून तिथे नेण्याऐवजी तिथेच मिळवणे अधिक सोयीचे ठरेल. पृथ्वीवरून चंद्रावर कार्बन नेणे हे अतिशय महागडे आहे. पृथ्वीच्या कक्षेत एक पौंड पेलोड घेऊन जाण्यासाठी सुमारे दहा हजार डॉलर्सचा खर्च येतो. त्यामुळे चंद्रावरील स्थानिक साधनसामग्रीच तिथे उपयुक्त ठरू शकते.