पुढारी ऑनलाईन डेस्क : पृथ्वीच्या पाठीवरील एक नितांत सुंदर देश म्हणजे आईसलँड. पण या देशात ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंप ही नेहमीची समस्या आहे. आता गेल्या १४ तासांत या देशात ८०० भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यानंतर या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. (Iceland earthquakes)
हे धक्के सौम्य आणि मध्यम तीव्रतेचे आहेत. देशाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या रेयकजेन्स द्विकल्प येथे हे भूकंप नोंदवले गेले आहेत. या भूकंपामुळे ज्वालामुखी उद्रेक होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. आईसलँडच्या नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, "भूकंपामुळे नागरी संरक्षणाची गरज लक्षात घेता ही आणीबाणी बोलवण्यात आली आहे. भूकंपाची तीव्रता वाढू शकते आणि ज्वालामुखीचा उद्रेकही होऊ शकतो."
गेल्या डिसेंबरपासून या परिसरात २४ हजार भूकंप झाले आहेत. तर आज दिवसभारात मध्य रात्रीपासून ते दुपारपर्यंत ८०० भूकंपांची नोंद झाली आहे. या परिसरात ब्लू लगून हे गरम पाण्याचे झरे आहेत. आईसलँडमधील हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे, तेही बंद करण्यात आले आहे. आईसलँडने ग्रिंडविक परिसरात सुरक्षेसाठी संरक्षक जहाजे तैनात केली आहेत. तसेच या परिसरात तात्पुरती निवारा केंद्रं उभी करण्यात आली आहेत.
रेयकजेन्समध्ये २०२१पासून ३ ज्वालामुखी उद्रेक नोंदवले गेले आहेत. आईसलँडमध्ये एकूण ३३ ज्वालामुखी आहेत. एप्रिल २०१०ला आईसलँडमध्ये मोठा ज्वालामुखी उद्रेक झाले होते.
हेही वाचा