नॉर्वेमध्ये समुद्रात सापडला मृदा ज्वालामुखी | पुढारी

नॉर्वेमध्ये समुद्रात सापडला मृदा ज्वालामुखी

लंडन : संशोधकांनी नॉर्वेच्या तटापासून काही अंतरावर बॅरेंटस् समुद्राच्या तळाशी एक ज्वालामुखी शोधला आहे. हा ज्वालामुखी 400 मीटर खोलीवर आहे. या ज्वालामुखीतून लाव्हा नव्हे तर माती बाहेर येते. बॅरेंटस् समुद्रात सापडलेला हा मृदेचा म्हणजेच मातीचा दुसरा ज्वालामुखी आहे. यापूर्वी 1995 मध्ये हकोन मोस्बी मड व्होल्कॅनोचा शोध लावण्यात आला होता.

संशोधकांनी या नव्या ज्वालामुखीस ‘बोरेलिस मड व्होल्कॅनो’ असे नाव दिले आहे. तो समुद्रतळाशी बनलेल्या 300 मीटर रुंद आणि 25 मीटर खोलीच्या खड्ड्यात आहे. त्याचा व्यास 7 मीटर असून उंची सुमारे 2.5 मीटर आहे. त्यामधून मिथेन वायू उत्सर्जित होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढवणार्‍या वायूंमध्ये मिथेनचा समावेश होतो. ‘मड व्होल्कॅनो’ला ‘मड डोम’ असेही म्हटले जाते. त्यांच्या आतून लाव्हा नव्हे तर माती किंवा स्लरी बाहेर पडत असते.

तसेच पाणी व गॅसही या ज्वालामुखीतून बाहेर पडतो. हे वास्तवात ज्वालामुखी नसतात; पण त्यांच्या अशा उत्सर्जनामुळे त्यांना ‘ज्वालामुखी’ म्हटले जाते. जमिनीखालील गरम पाण्याबरोबर माती बाहेर येत असते. तिला ‘स्लरी’ असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे अशा ज्वालामुखीतून 86 टक्के मिथेन वायू बाहेर पडतो. थोडासा कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनही बाहेर पडत असतो. ‘द आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे’च्या संशोधकांनी हा ज्वालामुखी शोधला आहे.

Back to top button