Israel-Hamas war : बायडेन यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल | पुढारी

Israel-Hamas war : बायडेन यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जागतिक नेत्यांनी प्रयत्न वाढवले आहेत. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी इस्रायलला भेट दिल्यानंतर आज (दि.१९) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ऋषी सुनक इस्रायलमधील तेल अवीव येथे पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्रपती इसाक हर्जोग यांची ते भेट घेणार आहेत.

संबंधित बातम्या : 

ऋषी सुनक हे बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेऊन समर्थन दर्शविणार आहेत. तसेच गाझा आणि इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतील. इस्रायलला भेट देण्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले होते की, ‘प्रत्येक नागरिकाचा मृत्यू ही शोकांतिका आहे. हमासच्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले हे भयंकर आहे. मंगळवारी गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात ५०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबाबत ऋषी सुनक म्हणाले की, ‘ही एक महत्त्वाची वेळ आहे ज्यामध्ये या प्रदेशातील आणि जगाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष आणखी वाढू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’ ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आश्वासन दिले की जेव्हा सलोख्यासाठी प्रयत्न केले जातात तेव्हा ब्रिटन या उपक्रमात आघाडीवर असेल.

इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात ब्रिटिश नागरिकांचाही समावेश आहे. नऊ ब्रिटिश नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेले लोक हमासच्या ताब्यात असल्याचे मानले जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या इस्रायल भेटीपूर्वी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लीव्हरली यांनीही गेल्या आठवड्यात इस्रायलला भेट दिली होती. इस्रायलशिवाय इजिप्त, तुर्की आणि कतारलाही भेट दिली. यावेळी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यावर चर्चा झाली. हा वाद सोडवण्यासाठी हे तिन्ही देश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ब्रिटिश सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button