Israel Hamas War : अलिबागचे 4 सुपुत्र इस्रायल युद्धभूमीवर सज्ज!

Israel Hamas War :  अलिबागचे 4 सुपुत्र इस्रायल युद्धभूमीवर सज्ज!
Published on
Updated on

रायगड : जन्माला आलेल्या वर्ष-सव्वा वर्षाच्या इस्रायली बालकांना पळवून कोंबड्यांच्या खुराड्यात डांबून त्यांना निर्घृणपणे ठार मारणे, मुली-विवाहितांचे घरांतून अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, त्यांचे विवस्त्रावस्थेतील फोटो व्हायरल करणे, वयस्क स्त्रियांवरही अत्याचार करणे, अशा अमानवीय अन् क्रूर कृत्यांविरोधात आता इस्रायलच्या घराघरांतून तरुण अत्याचारी 'हमास' या दहशतवादी संघटनेविरोधात युद्धात उतरले आहेत.

लष्करी गणवेश घालूनच तरुण युद्ध लढत आहेत. माझी दोन मुले आणि दोन पुतणे युद्धासाठी सज्ज आहेत. लष्करी संदेश आला की, तत्काळ आर्मी हेडक्वार्टरला ते पोहोचतात. युद्धात निकराने लढत आहेत. अंगावर शहारे आणणारी ही युद्धस्थिती जेरूसलेमपासून 30 कि.मी.वरील रामाल शहरात स्थायिक अलिबागचे सुपुत्र जॉनी मोझेस वाक्रुळकर यांनी खास 'पुढारी'जवळ कथन केली. अलिबागचे प्रतिनिधी जयंत धुळप यांनी शब्दबद्ध केलेली ही युद्धकथा जॉनी वाक्रुळकर यांच्याच शब्दांत…

'हमास'ने सर्वप्रथम पश्चिम इस्रायलवर हल्ले सुरू केले. ते परतवून लावण्यात इस्रायली लष्कराला मोठे यश आले आहे. दहशतवाद्यांची मोठी हानी होत असताना, काल (मंगळवार) पासून 'हमास'ने उत्तर इस्रायलवर मिसाईल आणि बॉम्बहल्ले सुरू केले आहेत. इस्रायली फौजा हे हल्ले परतवून लावण्यात नेटाने लढत आहेत.

वाक्रुळकर कुटुंबातील चार विवाहित तरुण युद्धासाठी सज्ज

इस्रायली लष्करात तरुणांची संख्या मोठी आहे. माझा मोठा मुलगा इदान (वय 32) आणि यानिव्ह (29) हे दोघेही लष्कराचा युनिफॉर्म घालून घरात तयार आहेत. फक्त लष्करी मुख्यालयातून संदेश येण्याची वाट पाहत आहेत. हे दोघेही पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन सज्ज झाले असून, त्यांच्या पत्नींनीदेखील त्यांना देशासाठी युद्धावर जाण्याकरिता मानसिक पाठबळ दिले आहे. माझा मोठा भाऊ लेव्ही यांचा मुलगा आदियेल हा इस्रायली लष्करात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. 'हमास'च्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल त्याचा इस्रायलने गौरवदेखील केला आहे. दुसरा भाऊ अ‍ॅलेक्स यांचा मुलगा एलिओर हादेखील लष्करी गणवेश घालून युद्धासाठी सज्ज आहे.

सायरन वाजताच सारे घरात जातात जीव मुठीत घेऊन!

संभाव्य हल्ल्याची कल्पना नागरिकांना देण्याकरिता लष्कराकडून सायरन वाजविला जातो. आम्ही सर्व आपापल्या घरांत जातो आणि जीव मुठीत घेऊन राहतो. आजच सात दिवसांचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. लाईट आणि पाणी जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी सात दिवसांकरिता आवश्यक ते सामान आणि पाणी घरात साठवून ठेेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेवटचे दोन ते तीन तास आहेत, त्यात आम्ही आता हे सामानसुमान आणि पाणी साठवणुकीची तयारी करीत आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news