Israeli Strikes Hit Lebanon | इस्रायलच्या हल्ल्यात Reuters च्या व्हिडिओ जर्नलिस्टचा मृत्यू, ६ पत्रकार जखमी | पुढारी

Israeli Strikes Hit Lebanon | इस्रायलच्या हल्ल्यात Reuters च्या व्हिडिओ जर्नलिस्टचा मृत्यू, ६ पत्रकार जखमी

पुढारी ऑनलाईन : दक्षिण लेबनॉनमध्ये शुक्रवारी इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या एका व्हिडिओ जर्नलिस्टचा मृत्यू झाला आहे. इतर सहा पत्रकारही जखमी झाले आहेत. अल जझीरा, एएफपी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थांच्या पत्रकारांचा एक गट इस्रायल सीमेला लागून असलेल्या लेबनॉनच्या दक्षिण भागात वार्तांकन करत होता. सध्या इस्त्रायल सीमेवर हिजबुल्लाह आणि इस्रायल एकमेकांवर हल्ले करत आहेत. लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती आणि हिजबुल्लाहने या घटनेला इस्रायलला जबाबदार धरले आहे. (Israeli Strikes Hit Lebanon)

संबंधित बातम्या 

इस्रायलच्या संरक्षण दलाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलार्ड एर्डन यांनी म्हटले आहे की, “त्यांचे काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराला लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नाही. यात कसलीही शंका नाही.” पण युद्धाच्या परिस्थितीत अशा घटना घडू शकतात हे तुम्हाला माहीत आहे.

इस्रायल या घटनेची चौकशी करेल. Reuters ने एक निवेदन जारी करत ब्रॉडकास्टर्ससाठी लाईव्ह व्हिडिओ सिग्नल देत असताना इस्सम अब्दुल्लाह याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचा कॅमेरा टेकड्यांच्या दिशेने होता. पण एका मोठ्या स्फोटाने त्याचा कॅमेरा हादरला. तिथे धुळीचा मोठा लोट दिसून आला आणि मग किंचाळण्याचा आवाज ऐकू आला.

“आमचा व्हिडिओग्राफर इस्सम अब्दुल्लाह याच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झाले,” असे रॉयटर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. “आम्ही तातडीने अधिक माहिती घेत आहोत. या प्रदेशातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहोत आणि इस्समच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना आधार देत आहोत.”

रॉयटर्सचे अन्य दोन पत्रकार थायर अल-सुदानी आणि महेर नाझेह या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असे रॉयटर्सने सांगितले.

नाझेह यांनी म्हटले आहे की रॉयटर्स आणि इतर दोन वृत्तसंस्था इस्त्रायलकडून येत असलेल्या क्षेपणास्त्राचे चित्रीकरण करत असताना अब्दुल्लाह यांचा मृत्यू झाला. ते एका उंच दगडावर बसले होते. काही सेकंदांनंतर दुसरे एक क्षेपणास्त्र पत्रकारांच्या कारला धडकले. यामुळे कारने पेट घेतला.

असोसिएटेड प्रेस ( Associated Press) आणि अल जझीरासह (Al Jazeera) इतर न्यूज आउटलेट्सने सांगितले की हे तोफगोळे इस्रायली होते. पण रॉयटर्स वृत्तसंस्था हे क्षेपणास्त्र खरोखरच इस्रायलने डागले होते की नाही हे स्पष्ट करु शकलेली नाही.

एजन्सी फ्रान्स-प्रेसने (AFP) सांगितले की त्यांचे दोन पत्रकार जखमी झाले आहेत. अल जझीराने सांगितले की त्यांचे दोन पत्रकारदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेसाठी त्यांनी इस्रायलला जबाबदार आहे. (Israeli Strikes Hit Lebanon)

“या गुन्हेगारी कृत्यामागील सर्व लोकांना जबाबदार धरले पाहिजे. आमच्या टीमच्या जवळ आणि शेजारी असलेल्या आंतरराष्‍ट्रीय मीडिया कर्मचार्‍यांच्‍या ठिकाणी हजर असताना ब्रॉडकास्‍ट वाहनावर बॉम्‍ब टाकला गेला आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले,” अल जझीराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अल्मा अल-शाब हे गाव चकमकीचे ठिकाण बनले आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल्लाह यांची आई फातिमा कान्सो यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. “इस्रायलने माझ्या मुलाची हेतूपूर्वक हत्या केली. त्याने ‘प्रेस’ हा शब्द दिसत असलेले जॅकेट घातले होते. इस्रायल हा गुन्हा नाकारू शकत नाही,” असेही त्यांनी पुढे म्हटले.

अब्दुल्लाह यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर हेल्मेट घातलेला एक फोटो पोस्ट केला होता. त्यांनी त्यावेळी “प्रेस” शब्द दिसत असलेले फ्लॅक जॅकेट घातले होते.

हे ही वाचा :

Back to top button