Israel Hamas War : अनेक गोमंतकीय अडकले बंकरमध्ये; गोमंतकीय महिलेने सांगितले भयावह वास्तव | पुढारी

Israel Hamas War : अनेक गोमंतकीय अडकले बंकरमध्ये; गोमंतकीय महिलेने सांगितले भयावह वास्तव

विशाल नाईक

मडगाव : हमासच्या निर्दयी हल्ल्यात लाखो निरपराध इस्रायली नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. कू्ररतेच्या सर्व सीमा ओलांडल्या जात आहेत. बालके, वृद्ध, महिलांनाही कोणतीही दया दाखविली जात नाही. बेचिराख होत असलेल्या इस्रायलमध्ये अनेक गोमंतकीयांवर जीव वाचवण्यासाठी बंकरचा आसरा घेण्याची वेळ आली आहे. त्यांना तेथून बाहेर पडताही येत नसल्याने गोव्यातील त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातवरण पसरले आहे. (Israel Hamas War)

इस्रायलच्या सध्याच्या परिस्थितीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी संगीत रजनीच्या कार्यक्रमात झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आल्यापासून तेथील परिस्थितीची जाणीव जगाला झाली. इस्रायलमध्ये सुमारे 28 लाख नागरिक अडकून पडले असून, त्यात काही गोमंतकीयांचाही समावेश आहे. त्यांना बाहेर पडता येत नसल्याने ज्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी त्यांना स्थानबद्ध स्थितीत थांबावे लागले आहे. सावर्डे गावच्या व्हिक्टोरिया मॅक्स अ‍ॅन्थोनी या अनेक वर्षांपासून इस्रायलमध्ये स्थायिक आहेत. सध्या त्या माष्कारेत बेथेयम या भागात आपल्या घर मालकिणीसह राहत आहेत. या भागात हमासकडून दररोज हल्ले होत आहेत. घरांची मोडतोड होत आहे. अशा परिस्थितीत त्या घर मालकिणीसह बंकर रूममध्ये थांबल्या आहेत. आपल्या जीवाला धोका नाही, असे त्यांनी कुटुंबीयांना कळवले असले तरी इस्राईलची परिस्थिती पाहता त्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या भागात व्हिक्टोरिया वास्तव्यास आहेत, तिथे अधूनमधून गोळीबार आणि मिसाईल हल्ले होत आहेत.

गेल्या आठवड्यापासून हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. चार दिवसांपूर्वी शेजारच्या इमारतीवर मिसाईल हल्ला झाला होता. त्यानंतर सर्वांनी बंकर रुमचा आसरा घेतला आहे. केवळ जेवणासाठी बाहेर काढले जाते. पॅनिक सायरनद्वारे हल्ल्यासंबंधी माहिती दिली जाते. त्यानंतर त्वरित सर्वजण बंकर रूममध्ये येतात. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी बंकर रूम बनवण्यात आल्याची माहिती व्हिक्टोरिया यांनी दिली. (Israel Hamas War)

इस्राईलच्या सीमेवरील गावांमध्ये भयंकर वाईट स्थिती आहे. इस्रायली नागरिकांना घराबाहेर काढून मारले जात आहे. त्यांचे मृतदेह रस्त्यांवर टाकून त्यांच्यावर मूत्रविसर्जन करून मृतदेहाची विटंबना केली जात आहे. हल्लेखोरांनी लहान मुली आणि वृद्ध महिलांनासुद्धा सोडलेले नाही. ज्यांचे अपहरण केले त्यांचे मृतदेहसुद्धा मिळालेले नाहीत. ज्या घरात भारतीय नागरिक कामाला होते, त्यांचाशी सध्या संपर्क होत नाही. गोमंतकीय नागरिकांशीसुद्धा अनेक दिवसांपासून संपर्क तुटला असल्याचे व्हिक्टोरिया म्हणाल्या.

हमासकडून लहान, किशोरवयीन मुलांच्या हातीसुध्दा हत्यारे देण्यात आली आहेत. त्यांच्याकडूनही अंधाधुंद गोळीबार सुरू आहे. नुकतेच या परिसरात काम करणार्‍या 16 नेपाळी कामगारांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांचे पुढे काय झाले याची कोणतीही माहिती नसल्याचे व्हिक्टोरिया यांनी सांगितले.

घराजवळ बॉम्ब स्फोटांचे आवाज

अजून आम्ही बाहेरचे जग पाहिलेले नाही. गोमंतकीय सहकारी कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत, याची कोणतीच माहिती नाही. घराजवळ बॉम्बचे आवाज येत आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत. लोक नारे देत आहेत. इथे भयंकर वाईट अवस्था आहे. येथील नागरिक बाहेर पडूच शकत नाहीत. बाहेर पडल्यास मृत्यू हमखास आहे, असे व्हिक्टोरिया मॅक्स अ‍ॅन्थोनी म्हणाल्या. (Israel Hamas War)

हेही वाचा : 

Back to top button