Hamas Israel conflict | इस्रायलचा गाझामधील विद्यापीठावर हल्ला, इमारती उद्ध्वस्त | पुढारी

Hamas Israel conflict | इस्रायलचा गाझामधील विद्यापीठावर हल्ला, इमारती उद्ध्वस्त

पुढारी ऑनलाईन : इस्रायल आणि हमास यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध आहे. दरम्यान, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी गाझा शहरातील इस्लामिक विद्यापीठावर हल्ला केला. याबाबतची माहिती एएफपी वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आणि हमासशी संबंधित संस्थेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. “लढाऊ विमानांच्या तीव्र हवाई हल्ल्यात इस्लामिक विद्यापीठाच्या काही इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे,” असे विद्यापीठ व्यवस्थापनाचे अहमद ओरबी यांनी एएफपीशी बोलताना सांगितले. (Hamas Israel conflict)

 संबंधित बातम्या 

इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १,२०० वर पोहोचली आहे. तर दोन्ही बाजूंकडील मृतांचा एकूण आकडा ३ हजारांवर गेला आहे. हा इस्रायलमधील ७५ वर्षांच्या इतिहासातील सर्वात घातक हल्ला आहे. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्येही मोठी जीवितहानी झाली आहे. संपूर्ण गाझावर ताबा मिळवल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

दरम्यान, गाझाच्या पॉवर ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की, इस्त्रायलने पुरवठा बंद केल्याने त्याचा एकमेव पॉवर प्लांट बंद पडण्याची शक्यता आहे. हमासच्या रक्तरंजित हल्ल्यानंतर गाझामधील सर्व वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पॅलेस्टिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात शनिवारपासून २२,६०० हून अधिक निवासी इमारती आणि १० आरोग्य सुविधा केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. तर ४८ शाळांचे नुकसान झाले आहे. इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी मंगळवारी गाझा सीमा भाग पुन्हा ताब्यात घेतला. (Hamas Israel conflict)

गाझा पट्टीतील १,८० हजार पॅलेस्टिनी नागरिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या निवारा केंद्रात आश्रय घेतला आहे. हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तदारादाखल गाझामधील २३ लाख लोकसंख्येच्या भूभागावर हल्ला केला. यामुळे शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

हे ही वाचा :

Back to top button