Hamas-Israel conflict : ‘हमास’चा ‘लादेन’ अशी ओळख असणारा देईफ आहे तरी कोण? | पुढारी

Hamas-Israel conflict : 'हमास'चा 'लादेन' अशी ओळख असणारा देईफ आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (दि.७) इस्त्रायलवर अभूतपूर्व हल्‍ला केला आणि  जगभरात खळबळ उडाली. पुढील काही तासांमध्ये इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडाला. (Hamas-Israel conflict) आता या युद्धाचे दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान, दहशतवादी संघटना  हमासचा म्‍होरक्‍या मोहम्मद देईफ (Mohammad Deif)  याची सगळीकडे चर्चा होत आहे. जाणून घेवूया हमासच्‍या या म्‍होरक्‍याविषयी…

आत्मघाती बॉम्बस्फोट ते इस्रायली सैनिकांचे अपहरण…

‘फायनान्शियल टाईम्स’मधील रिर्पोटनुसार, मोहम्मद देईफ याचा जन्म १९६५ मध्‍ये गाझा येथील खान युनिस निर्वासित शिबिरात मोहम्मद दीआब इब्राहिम अल-मसरी येथे झाला. काही रिपोर्टनुसार, पॅलेस्टिनींनी १९५० च्या दशकात इस्‍त्रायलविरोधात केलेल्‍या कारवाईत देईफ याच्‍या वडिलांसह काकांनीही भाग घेतला होता. देईफ याने गाझा इस्लामिक विद्यापीठात शिक्षण घेतले. १९८७ मध्‍ये दहशतवादी संघटना हमासची स्‍थापन झाली. देईफ हा वयाच्‍या वीसाव्या वर्षी हमासमध्ये सामील झाला. हमास दहशतवादी याह्या अय्याश याने त्‍याला प्रशिक्षित केले. त्‍याने अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट, इस्रायली सैनिकांचे अपहरण आणि रॉकेट हल्ले घडवून आणले.  इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शांतता करारातील सर्वात मोठा अडथळा म्हणूनही त्‍याच्‍या नावाची चर्चा जगभर सुरु झाली.

Mohammad Deif : … ताे सावली सारखा वावरताे

अत्‍यंत गुप्‍तपणे कारवाया करण्‍यात माहिर असलेला देईफ हा नेहमीच पॅलेस्‍टिनी नागरिकांमध्‍येच वावरतो. खूप कमी जणांनी त्‍याला प्रत्‍यक्ष पाहिले आहे. तो सावली सारखा वावरतो, असेही म्‍हटले जाते. तो वेगवेगळे पासपोर्ट वापरतो. तसेच सतत आपली ओळख बदलत असतो. १९९६ मध्ये इस्रायलने दहशतवादी अय्याशची हत्या केली. यानंतरच्‍या सर्व आत्मघाती बॉम्बस्फोटांचे कट देईफने रचले असे मानले जाते.  २००१ मध्ये त्‍याला अटकही झाली होती. मात्र काही दिवसांमध्‍ये त्‍याची सुटका झाली आणि तो पुन्‍हा दहशतवादी कारवायांमध्‍ये सक्रीय झाली. ( Hamas-Israel conflict )

Mohammad Deif : हत्येचा अनेकवेळा प्रयत्न

इजिप्तमधून शस्त्रे, इंधन आणि इतर वस्तूंची चोरटी आयात आणि गाझामध्ये बोगदे बांधण्यामागेही त्याचा हात असल्याचे मानले जाते. हमासची लष्करी शाखा असलेल्या कासम ब्रिगेडच्या लष्करी कमांडरची सूत्र स्‍वीकारल्‍यानंतर देईफ हा इस्रायलचा मोस्ट-वॉन्टेड दहशतवादी बनला. अमेरिकाही त्‍याचा मागावर आहे. तसेच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादही त्‍याच्‍या मागावर होती. मात्र जगातील बलाढ्य गुप्‍तचर संस्‍थेपैकी एक मोसादला चकवा देण्‍यात तो यशस्‍वी ठरला.

एक डोळा, एक हात आणि दोन पाय गमावले

इस्रायलच्या सुरक्षा संस्‍थानी देईफचा काटा काढण्‍याचा आतापर्यंत किमान पाच वेळा प्रयत्न केल्‍याचे मानले जाते. त्‍याने हे सर्व प्रयत्‍न निष्फळ ठरवले. २००१ मध्‍ये त्‍याचा हत्‍येचा पहिला प्रयत्‍न झाला. २००२ मध्‍ये इस्त्रायलने केलेल्‍या हवाई हल्ल्यात देईफ याने एक डोळा गमावला. यानंतर २००६ मध्‍ये हवाई हल्‍ल्‍यात दोन्ही पाय आणि एक हात गमावला आहे. तरीही त्‍याचे इस्‍त्रायलविरुद्‍धच्‍या कारवाया सुरुच राहिल्‍या आहेत. तसेच त्‍याचा ठावठिकाणा शाेधण्‍यातही इस्रायलच्या सुरक्षा संस्‍था अपयश आले आहे. ( Hamas-Israel conflict )

७ ऑक्‍टाेबरला राबवले ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म

अनेक हल्‍ल्‍यात आपले अवयव गमावणार्‍या देईफने अखेर शनिवार, ७ ऑक्‍टोबर रोजी इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला. ‘एपी’ने दिलेल्‍या वृत्तानुसार देईफ याने इस्‍त्रायलविरुद्‍धच्‍या ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म राबवले. द न्यूयॉर्क टाइम्सने सुरक्षाविषयक बाबींमध्ये तज्ञ असलेल्या इस्रायली पत्रकार रोनेन बर्गमनचा हवाला देऊन म्हटले आहे की, “हमासमधील देईफ सर्वाधिक काळ जिंवत राहिला एक म्‍होरक्‍या आहे. अनेक प्राणघातक हल्‍ल्‍यातून तो बचावला आहे. तसेच गंभीर दुखापतींमधून बरा झाला आहे. त्‍यामुळे त्‍याची एक योद्‍धा अशी प्रतिमा निर्माण करण्‍यात हमासला यश आले आहे.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button