पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमासमधील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. या युद्धात मराठी अभिनेत्री मधुरा नाईक हिची बहीण आणि बहिणीच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर अभिनेत्रीच्या घरात शोककळा पसरली आहे. (Israel-Hamas War) मधुरा नाईकने याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. आता दोन्ही बाजूंनी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांव्यतिरिक्त परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाही इस्रायलमध्ये अडकली होती. मात्र, ती आता सुखरूप परतली आहे. दरम्यान 'नागिन' फेम अभिनेत्री मधुरा नाईकने तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांना या युद्धात गमावले आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री मधुरा नाईक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की," मी मधुरा नाईक. मी मूळ भारतीय वंशाची एक ज्यू महिला आहे. भारतात सध्या ३००० ज्यू आहेत. ७ ऑक्टोबरच्या एक दिवस आधी आमच्या कुटुंबाने एक मुलगी आणि मुलगा गमावला. मी आणि माझे कुटुंब ज्या दु:खातून जात आहोत ते शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे. आज इस्रायल दु:खात आहे, लहान मुले, महिला आणि वृद्ध हमासच्या आगीत जळत आहेत.
अभिनेत्री पुढे म्हणते की, "मुले, महिला आणि वृद्ध लोक हमासच्या हल्ल्यात जळत आहेत. या सर्वांना टार्गेट केले जात आहे. काल मी माझी बहीण, बहिणीचा पती आणि त्यांच्या लाडक्या मुलांचा फोटो शेअर केला. जेणेकरून जगाला आपले दुःख समजेल. मला माझे दुःख माझ्या प्रियजनांसोबत शेअर करायचे होते.
मला माझे अनुयायी, मित्र, माझ्यावर प्रेम करणारे आणि मला पाठिंबा देणार्या लोकांना सांगायचे आहे, ज्यांनी माझ्यावर फक्त प्रेम केले आणि ज्यांनी इतकी वर्षे माझी प्रशंसा केली, त्यांना सांगायचे आहे की पॅलेस्टाईन समर्थक प्रचारक इस्रायलच्या लोकांना हत्यारे म्हणून दाखवू इच्छीत आहेत. हे योग्य नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही आणि मला सांगायचे आहे की मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही."
हेही वाचा