Nobel Peace Prize 2023: सध्या तुरुंगात असलेल्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेसाठीचा नोबेल जाहीर | पुढारी

Nobel Peace Prize 2023: सध्या तुरुंगात असलेल्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेसाठीचा नोबेल जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सध्या तुरुंगवासात असलेल्या इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना यंदाचे शांततेचे नोबेल जाहीर झाले आहे.  ‘इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा, मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचारासाठी’ त्यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने आज (दि.६) शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाची घोषणा केली, यावेळी स्पष्ट केले. (Nobel Peace Prize 2023)

संबंधित बातम्या:

शांततेचे नोबेल पारितोषिक विजेत्या नर्गेस मोहम्मदी एक महिला, मानवाधिकार वकील आणि स्वातंत्र्यसैनिक आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी त्यांनी धाडसी संघर्ष केला आहे. या लढ्यादरम्यान इराणच्या राजवटीने नर्गेस यांना १३ वेळा अटक केली आहे.तसेच पाच वेळा दोषी ठरवले आहे. महिलांच्या अन्यायाविरूद्धच्या संघर्षात त्यांना आत्तापर्यंत ३१ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे. या लढ्यात त्यांना १५४ वेळा लाटीमार करण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात नर्गेस मोहम्मदी अजूनही तुरुंगातच आहेत, असेही रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. (Nobel Peace Prize 2023)

शांतता पारितोषिक विजेत्या मोहम्मदी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर, या वर्षी फाशीच्या शिक्षेच्या वापराविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी स्वतःला झोकून दिले. फाशीच्या शिक्षेविरुद्धच्या  नर्गेस यांच्या सक्रियतेमुळे २०१५  मध्ये त्यांना पुन्हा अटक झाली. यानंतर त्यांनाया प्रकरणात अधिक वर्षांची शिक्षा झाली. नर्गेस मोहम्मदी यांच्यावरही इराणच्या राजवटीविरुद्ध ‘प्रचार पसरवल्याचा’ आरोप आहे. 2003 चे नोबेल शांतता पारितोषिक विजेते शिरीन एबादी यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या त्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटरच्या उपप्रमुख आहेत, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Nobel Peace Prize 2023)

नोबेल पारितोषिक वितरणाच्या चौथ्या दिवशी आज (दि.६) रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने शांततेसाठीच्या नोबेलची घोषणा केली. काल गुरूवारी (दि.५) साहित्यातील, बुधवारी (दि.४) रसायनशास्त्रातील, मंगळवारी (दि. ३) भौतिकशास्त्रातील  तर सोमवारी (दि.२) वैद्यकीयशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली होती. (Nobel Peace Prize 2023)

हेही वाचा:

 

Back to top button