पुतिन यांना विरोध म्‍हणजे मृत्‍यूशी ‘गाठ’!, कोणाला विषबाधा, तर कोणाला घातल्‍या गोळ्या… | पुढारी

पुतिन यांना विरोध म्‍हणजे मृत्‍यूशी 'गाठ'!, कोणाला विषबाधा, तर कोणाला घातल्‍या गोळ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे कधीच माफ करत नाहीत आणि विसरत नाहीत,” असे ट्विट रशियातील सर्वात मोठे अमेरिकेतील गुंतवणूकदार बिल ब्राउडर यांनी काही वर्षांपूर्वी रशिया सोडण्‍यापूर्वी केले होते. आपला हुकूम धुडकावेल तो देशद्रोही, आपल्‍याला विरोध करेल तो कट्टर शत्रूच, असे त्‍यांचे धाेरण. विरोधकांनी आपल्‍याविरोधात बंडाचा झेंडा फडकविला तर त्‍याला एकमेव शिक्षा म्‍हणजे त्‍यांची थेट मृत्‍यूशी गाठ बांधणे. कोणत्‍याही हुकूमशाही असणार्‍या देशातील हे चित्र गेली दोन दशक रशियामध्‍ये आहे. हा सारा तपशील देण्‍याचे कारण म्‍हणजे पुतिन ( Russian President Putin) यांच्‍याविरोधात बंडाचा झेंडा फडकविणारे वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा नुकताच विमान अपघातात मृत्‍यू झाला आहे. प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्‍यू हा निव्‍वळ योगायोग नाही. त्‍यामुळेच रशियात आजवर राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांना विरोध करणार्‍यांचे काय झालं याविषयी जाणून घेवूया…

Russian President Putin : विरोधकांना एकच शिक्षा थेट मृत्‍यूदंड!

सोव्हिएत संघाचं विभाजन ही विसाव्या शतकातील जगामधली सर्वांत भयंकर राजकीय शोकांतिका आहे, असे विधान रशियन व्लादिमीर पुतिन यांनी ९०च्‍या दशकात केले हाेते. २००० मध्‍ये रशियाच्‍या सत्तेची सूत्रे त्‍यांच्‍या हाती आली. ते राष्‍ट्राध्‍यक्ष झाले. यानंतर त्‍यांनी अमेरिका व तिच्‍या ‘नाटो’तील मित्र देशांकडून होणारा अपमान अनेक वर्ष सहन केल्‍यानंतर आता रशिया पुन्‍हा जागतिक महासत्ता म्‍हणून पुढे येईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला होता. गेली दोन दशके त्‍यांनी रशियाच्‍या सत्तेवर कल्‍पनातीत पकड ठेवली आहे. पुतिन यांच्‍याविषयी अनेक आख्‍यायिका प्रसिद्ध आहेत. आजवर ज्‍यांनी पुतिन यांना विरोध केला त्‍यांची गाठ थेट मृत्‍यूशी बांधली गेली आहे.

बंडानंतर दोन महिन्‍यातच प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्‍यू

आजवर पुतिन यांना राजकीय विरोध करणार्‍यांचा शेवट कसा झाला, याबाबतचे वृत्त अमेरिकन वृत्तसंस्‍था ‘सीएएन’ने दिले आहे. वॅग्नर ग्रुप हा रशियातील खासगी सैन्‍य आहे. या ग्रुपचे येवगेनी प्रिगोझिन प्रमुख हाेते. एकेकाळी प्रिगोझिन हे पुतिन यांचे सर्वात निकटवर्ती मानले जात. पुतिन यांच्‍या हट्टामुळे युक्रेन युद्ध सुरु झाले. याला दीड वर्ष झाले तरी रशियाला  निर्णायक यश मिळालेले नाही. त्यामुळे रशियात पुतिन यांच्‍या नेतृत्त्‍वाविरोधात सूर उमटत असल्‍याची चर्चा पाश्‍चात्‍य माध्‍यमातून होती. यानंतर प्रिगोझिन यांनी बंडाची घोषणा केली आणि जगभरात खळबळ माजली. आता रशियाचे पुन्‍हा तुकडे होणार?, युक्रेनचे युद्ध थांबणार? अशी अनेक विश्‍लेषण करण्‍यात येवू लागली. मात्र प्रिगोझिन यांचे बंड औटघटकेचे म्‍हणजे केवळ काही तासांचे ठरले. तलवार म्‍यान करत प्रिगोझिन पुतिन यांना शरण गेले. त्‍याचचेळी अनेकांनी त्‍यांच्‍या भविष्याबद्दल शंका व्‍यक्‍त केली होती. आता त्‍यांचा विमान अपघातात मृत्‍यू झाला आहे. प्रिगोझिन प्रवास करत असलेले विमान नेमकं कसे कोसळले याचे कारण अज्ञातच राहिले आहे.

माजी उपपंतप्रधान बोरिस नेमत्सोव्ह यांची गोळ्या झाडून हत्‍या

बोरिस येल्‍तासिन हे रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष होते. त्‍यांच्‍या सरकारमध्‍ये बोरिस येल्‍तसिन हे उपपंतप्रधान होते. सत्तेतून पायउतार झाल्‍यानंतर ते रिपब्‍लिकन पार्टी ऑफ रशिया या उदारमतवादी पक्षाचे नेते झाले. पुतिन यांच्‍या सरकारविरोधात त्‍यांनी अनेकवेळा टीका केली. यामुळे त्‍यांना अटकही झाली होती. अखेर फेब्रुवारी २०१५मध्‍ये मॉस्‍कोमध्‍ये आपल्‍या मैत्रिणीसोबत रस्‍त्‍यावर फिरत असताना त्‍यांची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली. त्‍यांच्‍यावर हल्‍ला होण्‍यापूर्वी काही तास आधी त्‍यांनी ‘न्‍यूज वीक’ या मासिकाला मुलाखत दिली होती. यामध्ये त्‍यांनी म्‍हटलं होतं की, पुतिन यांच्‍या नेतृत्‍वाखाली रशिया रसातळला जात आहे. रशिया खूप वेगाने एक हुकूमशाही असणारे राष्‍ट्र होत आहे. या धोरणांमुळे अतुलनीय क्षमता असलेला देश बुडत आहे. नेमत्‍सोव्‍ह यांची हत्‍या मॉस्‍को येथे पुतिन यांच्‍याविरोधात निघणार्‍या रॅलीच्‍या आधी दोन दिवस झाली होती. या हत्‍येमागे पुतीन यांच्या प्रशासनाचा सहभाग असल्याचा दावा नेम्त्सोव्ह समर्थकांनी केला होता.

बेरेझोव्स्कींचा ब्रिटनमध्‍ये संशयास्‍पद मृत्‍यू

बोरिस बेरेझोव्स्की यांनी मॉस्‍कोमध्‍ये गणिताचे प्राध्‍यापक म्‍हणून आपली कारकीर्द सुरु केली होती. यानंतर त्‍यांनी अलिशान कार उद्योगात गुंतवणूक केली. यातून त्‍यांनी रशियन माध्‍यम क्षेत्रात खरेदी केली. यावेळी त्‍यांच्या संपत्तीमध्‍ये मोठी वाढ झाली. त्यांचा  राजकीय प्रभावही मोठा होता. बेरेझोव्स्की यांना २००७ मध्ये रशियन कोर्टाने फसवणूक आणि कर चुकविल्याबद्दल दोषी ठरवले होते. यानंतर पुतिन यांच्‍याबरोबर झालेल्‍या मतभेदानंतर त्‍यांनी ब्रिटनमध्‍ये पलायन केले. ब्रिटनमध्‍ये राहून त्‍यांनी पुतिन यांच्‍याविरोधात आंदोलन करण्‍यास सुरुवात केली. पुतिन यांना राष्‍ट्राध्‍यक्षपदावरुन पदच्युत करण्यासाठी बंडाची हाक दिली. मात्र २०१३ मध्‍ये ब्रिटनमधील घरात त्‍यांचा मृतदेह गळफास लावलेल्‍या अवस्‍थेत आढळला. त्‍यांनी स्‍वत: जीवन संपवले, असे ब्रिटीनशच्‍या पोलिसांनी म्‍हटले होते. मात्र त्‍यांच्‍या समर्थकांनी बेरेझोव्स्की यांचा मृत्‍यू संशयास्‍पद असल्याचे म्हटले होते.

Russian President Putin : अलेक्झांडर पेरेपिलिचनी यांना विषबाधा

अलेक्झांडर पेरेपिलिचनी हे एक अर्थ सल्‍लागार होते. त्‍यांनी रशियाच्‍या कर अधिकार्‍यांविरुद्ध फसवणुकीचे पुरावे दिले होते. त्‍यांनी रशियातील मोठा भष्‍ट्राचार उघडकीस आणला होता. पेरेपिलिचनी हे लंडनमधील सरे येथे वास्‍तव्‍यास होते. कोट्यवधी डॉलरच्या रशियन मनी-लाँडरिंग ऑपरेशनचा पर्दाफाश करण्यासाठी ते मदत करत होते. २०१२मध्‍ये वयाच्‍या ४४ वर्षी घरी जॉगिंग करत असताना त्यांचा आकस्‍मिक मृत्‍यू झाला होता. २०१५ मध्‍ये केवमधील रॉयल बोटॅनिक गार्डन्समधील वनस्पती विषशास्त्र तज्ज्ञांनी कोरोनरच्या न्यायालयात सांगितले की होते की, त्याच्या पोटात दुर्मिळ वनस्पती विष – जेलसेमियम आढळले होते. हे विष रशियन डिश सॉरेल सूपमध्ये मिसळले गेले असावे, अलेक्झांडर यांनी ही डिश मृत्यूच्या काही काळापूर्वी खाल्ली होती. मात्र विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र कोट्यवधी डॉलरच्या रशियन मनी-लाँडरिंग ऑपरेशनचा पर्दाफाश करण्यासाठी मदत करत असल्‍यानेच यांना विषबाधा झाल्‍याचे दावा त्‍यावेळी करण्‍यात आला होता.

Russian President Putin : सर्गेई मॅग्निटस्कींचा रशियाच्‍या तुरुंगात मृत्‍यू

Russian President Putin

रशियातील सर्वात मोठे अमेरिकेतील गुंतवणूकदार बिल ब्राउडर यांच्‍या अमेरिकन आर्थिक गुंतवणूक संस्‍थेत सर्गेई मॅग्निटस्की काम करत होते. दशलक्ष डॉलर कर फसवणूक प्रकरणात रशियन सरकारी अधिकारी गुंतलेले असल्याचा पुरावा उघड करण्यात त्‍यांनी मदत केल्‍याचा आरोप होता. या प्रकरणी २००८ मध्‍ये त्‍यांना अटक करण्‍यात आली. मात्र नजरकैदेत असतानाच एक वर्षाच त्‍यांचा तुरुंगात मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी सांगितले होते की, रशियाच्‍या सरकारने त्‍यांना वैद्यकीय सेवा दिली नाही. सर्गेई मॅग्निटस्‍की यांच्‍या कुटुंबीयांना न्‍याय देण्‍यासाठी बिल ब्राउडर यांनी अमेरिकेत एक मोहिम राबवली. रशियामध्ये मॅग्नीत्स्कीच्या मृत्यू आणि इतर मानवी हक्क उल्लंघनांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना मंजूरी देणारा कायदा अमेरिकेच्‍या संसदेत सादर करण्याचे आवाहन केले. मॅग्निटस्की कायदा 2012 मध्ये मंजूर केला होता. अमेरिकेच्‍या संसदेत मॅग्निटस्की कायदा मंजूर झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर पुतिन यांच्‍या सरकारने रशियन मुलांना अमेरिकन दत्तक घेण्यावर बंदी घातली. आजही ती कायम आहे.

एका माणसाला गप्प करण्यात यशस्वी व्हाल, पण… : लिटव्हिनेन्को

Russian President Putin

अलेक्झांडर लिटव्हिनेन्को यांनी FSB, KGB या रशियाच्या गुप्‍तहेर संस्‍थांसाठी काम केले होते. सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर ते भ्रष्टाचारविरोधी विभागाचे(एफएसबी) प्रमुख झाले. येथे त्‍यांचे अनेक शत्रू बनले. १९९९ मध्‍ये रशियामध्ये अपार्टमेंट बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणल्याचा आरोप लिटविनेन्को यांनी केला. यामध्‍ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्‍याच वर्षाच्‍या अखेरीस रशियाने चेचन्यावर आक्रमण केले होते. लिटव्हिनेन्को यांच्या पत्‍नीने दावा केला होता की. त्‍यांनी ब्रिटनसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. 2006 मध्ये त्‍यांना विषबाध झाला होती. लंडनच्या हॉटेल बारमध्ये दोन रशियन एजंटांमुळे त्‍यांना विषबाधा झाली. त्‍यांच्‍या ग्रीन टीला अत्यंत किरणोत्सर्गी पोलोनियम-210 सह अणकुचीदार केले होते. विषबाधा झाल्‍यानंतर एका आठवड्यात त्‍यांचा मृत्यू झाला. “तुम्ही एका माणसाला गप्प करण्यात यशस्वी व्हाल; पण जगभरच्या निषेधाचा आक्रोश, मिस्टर पुतिन, आयुष्यभर तुमच्या कानात वाजत राहील,” असे मृत्यूशय्येवर असताना त्‍यांनी प्रसिद्ध केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं होते.

या प्रकरणी न्यायाधीश रॉबर्ट ओवेन यांच्या नेतृत्वाखालील चौकशीत म्हटले होते की, पुतिन यांनी माजी गुप्तहेराच्या हत्येला कदाचित मान्यता दिली आहे. रशियाने नेहमीप्रमाणे हे आरोप फेटाळले. विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या दोन गुप्‍तहेरांना ब्रिटनला सुपूर्द करण्यास नकार दिला.

चेचन्यातील युद्धावर टीका : पॉलिटकोव्हस्का यांची गोळ्या झाडून हत्‍या

चेचन्यातील युद्धावर टीका करणार्‍या ॲना पॉलिटकोव्हस्का यांची २००६ मध्‍ये मॉस्‍कोमध्‍ये गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती. यावेळी न्यूयॉर्कमधील ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स’ने म्हटले होते की, चेचन्यातील मानवी हक्कांच्या गैरवापराचा इतिहास मांडणाऱ्या कामामुळे पॉलिटकोव्हस्का यांना धमक्‍का येत होता. त्‍या रशियन अधिकाऱ्यांच्‍या टार्गेटवर होत्‍या. हत्‍येच्‍या सूत्रधाराला 150,000 डॉलर्सची सूपारी देण्‍यात आल्‍याचे तपासात उघड झाले होते. नेहमी प्रमाणे पुतिन सरकारने सर्व आरोप फेटाळले होते.

Russian President Putin : गेनाडी लोपिरेव्हांचा संशयास्‍पद मृत्‍यू

पुतिन यांच्‍या विरोधकांच्‍या मृत्‍यूची यादीवर पुस्‍तकच होवू शकते, असे ‘सीएएन’ने आपल्‍या वृत्तात म्‍हटले आहे. २०१७ मध्‍ये पुतिन यांच्‍या समुद्रातील निवास्‍थानाच्‍या बांधकामाची माहिती असणारे जनरल गेनाडी लोपिरेव्ह यांना लाचखोरी प्रकरणी दोषी ठरले होते. त्‍यांना १० वर्षांची शिक्षा झाली हाोती. मात्र कोठडीत त्‍यांचा मृत्‍यू झाला. आपल्‍यावरील सर्व आरोप निराधात असल्‍याचा दावा लोपिरेव्ह करत असत. वॉशिंग्टनमधील थिंक टँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर या संस्थेने लोपिरेव्हच्या मृत्यू “संशयास्पद” असल्‍याचे म्‍हटले होते. पुतीन यांच्‍या समुद्रातील निवासस्‍थानाची सर्व माहिती असल्‍यानेच लोपिरेव्‍ह यांना जीव गमावावा लागल्‍याचा दावाही या संस्‍थेने केला होता.

 वर्षभरात रशियात १३ हून अधिक व्‍यावसायिकांचा संशयास्‍पद मृत्‍यू

रशियाचे विज्ञान आणि उच्च शिक्षण उपमंत्री प्योत्र कुचेरेन्को यांचा क्युबाच्या सहलीवरून परतत असताना मृत्‍यू झाला होता. गेल्‍या वर्षभरात सुमारे १३ हून अधिक रशियन व्यावसायिकांनी आपलं जीवन संपवले आहे किंवा गूढ परिस्थितीत त्‍यांचा मृत्‍यू झाला आहे. रशियन खासदार पावेल अँटोव्ह यांचा डिसेंबरमध्ये भारतात हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. अँटोव्हच्या 65 व्या वाढदिवशी दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्र आणि प्रवासी सहकारी व्लादिमीर बुडानोव्ह यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ते ६१ वर्षांचे होते. रशियातील दाेघांचा आकस्‍मिक मृत्‍यू झाल्‍याने भारतातही खळबळ उडाली हाेती.

पाणबुड्या निर्मितीमधील प्रमुख रशियन शिपयार्डचे प्रमुख अलेक्झांडर बुझाकोव्ह यांचाही डिसेंबरमध्ये आकस्‍मिक मृत्‍यू झाला होता. त्‍यांच्‍या मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट झाले नाही, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले होते. यानंतर मॉस्को एव्हिएशन इन्स्टिट्यूटचे माजी रेक्टर अनातोली गेराश्चेन्को यांचाही सप्टेंबर २०२२मध्ये एका अपघातात निधन झाले. तर ल्युकोइलचे अध्यक्ष रविल मॅगानोव्ह यांचाही गेल्या सप्टेंबरमध्ये मॉस्को रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला होता.

विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांना तब्‍बल १९ वर्षांची शिक्षा

रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्‍सी नवलनी हे मागील अनेक वर्ष पुतिन यांच्‍या कारभाराविरोधात आवाज उठवत आहेत. २०११ मध्‍ये रशियन संसदीय निवडणुकीतील फसवणुकीच्या आरोपांवरून मोठ्या प्रमाणात निदर्शने करणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून ते उदयास आले. वकील असणारे अलेक्‍सी यांनी वारंवार रस्त्यावर निदर्शने केली. पुतीन यांचा युनायटेड रशिया पक्ष हा बदमाश आणि चोरांचा पक्ष आहे, असा आरोपही ते करत आले आहेत. त्‍यांना अनेकवेळा अटक करण्‍यात आली आहे. प्रकृती अवस्‍थेमुळे त्‍यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर पोलिस कोठडीत असताना त्‍यांना चहातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला. त्यांना उपचारासाठी जर्मन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जानेवारी २०२१ मध्‍ये ते रशियाला परतले. मात्र पुन्‍हा त्‍यांची रवानागी कारागृहात करण्‍यात आली आहे. नुकतेच म्‍हणजे ४ ऑगस्‍ट २०२३ रोजी त्‍यांना १९ वर्षांच्‍या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरेकी संघटना स्थापन करणे आणि त्याला आर्थिक निधी पुरवल्‍याच्‍या आरोपावरुन ही शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. यापूर्वी विविध कथित गुन्‍ह्यांसाठी त्‍यांना ११ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा सुनावण्‍यात आली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button