पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनमध्ये एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील युद्ध शांत करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये चर्चा सुरू आहे. असे असतानाही दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. दरम्यान, पूर्व युक्रेनमधील पोक्रोव्हस्क शहरात रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले, तर ३० हून अधिक जखमी झाले.
युक्रेनने या हल्ल्याचा निषेध केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की मॉस्कोने एका साध्या निवासी इमारतीवर हल्ला केला. त्यांनी सोव्हिएत काळातील पाच मजली इमारतीचे फुटेजही प्रसिद्ध केले आहे. या इमारतीचा वरचा मजला उद्ध्वस्त झाला आहे. हल्ल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. आपल्या पोस्टमध्ये, झेलेन्स्की यांनी लिहिले की मलबा अद्याप साफ केला जात आहे आणि "शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्याला रशियन दहशतवाद थांबवायचा आहे. युक्रेनला मदत करणारे जगातील प्रत्येकजण आपल्यासोबत मिळून दहशतवाद्यांचा पराभव करेल. या भयंकर युद्धात रशियाने जे काही केले त्यासाठी त्याला जबाबदार धरले जाईल.
युक्रेनचे मंत्री इगोर क्लिमेंको यांनीही टेलिग्रामवर या हल्ल्यांची माहिती दिली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या हल्ल्यात डोनेस्तक विभागातील एक उच्चपदस्थ आपत्कालीन अधिकारी मारला गेला. या हल्ल्यांमध्ये ३१ जण जखमी झाले आहेत. यामध्ये १९ पोलीस अधिकारी, पाच बचाव कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे. पोकरोव्स्क हे रशियन-व्याप्त डोनेत्स्क शहराच्या वायव्येस सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे.
हेही वाचा :