

श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था : चंद्राचे आकर्षण पूर्वापार आहे. साक्षात प्रभू रामचंद्रही बालपणी चंद्रासाठी हट्टाला पेटले होते. शेवटी पाण्याने भरलेल्या थाळीत त्यांच्यासाठी चंद्र उतरविण्यात आला होता. चंद्र हा आपल्याकडे मुलांचा मामाच… कुणाकडे गेले की कसे वागावे, त्याचा पहिला संस्कार मामाच्या घरूनच मिळतो. अगदी तसेच अनंत ब्रह्मांडाची रहस्ये उलगडायची, तर त्याची पहिली पायरी चंद्र हाच आहे. येत्या शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता इतिहासाच्या पानावर एक नवा अध्याय लिहिण्यासाठी आणि ही पायरी चढण्यासाठी भारतही सज्ज आहे. 23 अथवा 24 ऑगस्ट या तारखांची मग तो वाट बघेल… विक्रम लँडर चांदोबावर उतरताच भारत असे यश मिळविणार्या अमेरिका, रशिया, चीन या महासत्तांच्या यादीत जाऊन धडकेल. किंबहुना या तिन्ही महासत्तांपेक्षाही भारताचे हे यश अधिक देदीप्यमान असेल. कारण, हे तिन्ही देश चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरलेले आहेत. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे धाडस करणारे पहिले आहोत. त्यामुळे भारतीयांचे लक्ष जसे चांद्रयान-3 कडे (Chandrayaan-3) आहे, तसेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे आहे. (Chandrayaan-3)
श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-2 मोहिमेत चंद्रावर उतरतानाच लँडर कोसळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'इस्रो'चे तत्कालीन प्रमुख सीवन यांच्यासह अवघा देश त्या प्रसंगाने हळहळला होता. लँडिंग यशस्वी होते की नाही म्हणून भीतीच्या सावटाखाली अवघ्या देशाने घालविलेली ती 15 मिनिटे आजही अंगावर काटा उभा करतात.
चंद्राला स्पर्श करण्याचे अपूर्ण राहिलेले ते स्वप्न यावेळी पूर्ण व्हावे म्हणून 'इस्रो'ने कुठलीही कसर सोडलेली नाही. चांद्रयान-1 पूर्णपणे यशस्वी ठरलेले होते. त्यामुळे चांद्रयान-2 ही पूर्वयशावर आधारलेली मोहीम होती; पण तिला मर्यादित यश मिळाले. आपण चंद्रावर स्थिरावू शकलो नाही. त्यामुळे चांद्रयान-3 ही मोहीम चांद्रयानच्या अपयशावर (मर्यादित) आधारलेली आहे.
ज्या-ज्या कारणांनी हे अपयश आले, त्या-त्या कारणांचे सखोल अध्ययन 'इस्रो'ने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) केले आणि आनुषंगिक बदल नव्या मोहिमेत केलेले आहेत.
अपयशाधारित द़ृष्टिकोनाची (फेल्युअर बेस्ड प्रोच) या मोहिमेसाठी केलेली निवड सार्थ ठरावी म्हणून अवघा देश आतापासून उत्सुक आहे.
चांद्रयान-3'मधील सुधारणा
चंद्रयान-2 हे 22 जुलै 2019 ला प्रक्षेपित झाले होते. 6 सप्टेंबरला यानाचे लँडर चंद्रावर उतरणे अपेक्षित होते. लँडिंगनंतर लँडरमधून रोव्हर प्रज्ञान बाहेर पडणे आणि त्याने चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर चालत राहायचे होते. संशोधन करायचे होते; पण ते घडू शकले नाही. 7 सप्टेंबरला पहाटे पावणे तीनवाजता क्रॅश लँडिंगने रात्री उशिरापर्यंत जागे राहिलेल्या कोट्यवधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
लँडिंग करताना सूर्यप्रकाश असला पाहिजे म्हणून चंद्रावर सूर्योदय केव्हा होईल, या आधारावरच चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगची तारीख निश्चित केली जाते. चंद्रावर सलग 14-15 दिवस सूर्यप्रकाश (दिवस) असतो आणि पुढे सलग 14-15 दिवस रात्र असते.
अपयशाच्या सर्व शक्यतांचा आधीच आढावा घेऊन प्रकल्पाची रचना करणे म्हणजे अपयशाधारित द़ृष्टिकोन…
अपयशाच्या सर्वच शक्यता गृहित धरून नव्या मोहिमेत त्या-त्या शक्यतेच्या अनुषंगाने 'इस्रो'ने सुधारणा केल्या आहेत.
महत्त्वाचे टप्पे, घटक, मानके, संभाव्य वैविध्यपूर्ण शक्यतांचे सखोल मूल्यांकन या द़ृष्टिकोनांतर्गत केले जाते.
चांद्रयान-3 नंतर 'इस्रो' जपानसह एक नवी चांद्रमोहीम आखणार आहे. जपानच्या जाक्सा या अंतराळ संशोधन संस्थेसोबत त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. शिवाय सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सौर मोहीमही 'इस्रो' राबविणार आहे.
चांद्रयान-3 चा अवघा आकृतिबंध चांद्रयान-2 च्या अपयशावर आधारित आहे. फक्त यशासाठीच ही 615 कोटींची आणि अनंतकोटी कष्टांची मोहीम आहे.
– एस. सोमनाथ, अध्यक्ष, 'इस्रो'
हेही वाचा :