पंतप्रधान माेदींच्‍या अमेरिका दौर्‍यापूर्वी न्‍यू जर्सीतील रेस्‍टॉरंटने लाँच केली Modi Ji Thali | पुढारी

पंतप्रधान माेदींच्‍या अमेरिका दौर्‍यापूर्वी न्‍यू जर्सीतील रेस्‍टॉरंटने लाँच केली Modi Ji Thali

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्‍याच्‍या अखेरीस अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत.  अमेरिकेतील भारतीय पंतप्रधान मोदी यांचे भव्‍य स्‍वागत करण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. याचाच एक भाग म्‍हणून न्‍यू जर्सीतील एका रेस्‍टॉरंटने ‘मोदी जी थाळी’ ( Modi Ji Thali ) लाँच केली असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. जाणून घेवूया शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी तयार केलेल्‍या या थाळीविषयी…

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा बहुचर्चित ठरला आहे. मागील अमेरिका दौर्‍यावेळीही त्‍याचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले होते. आता पुन्‍हा एकदा अमेरिकेतील भारतीय  मोदी यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहेत.

Modi Ji Thali भरड धान्‍य वर्षाला समर्पित…

मोदी जी थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसों का साग, काश्मिरी दम आलू, इडली, ढोकळा आणि पापड यासारख्या पारंपारिक भारतीय पदार्थांचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, “येथील भारतीयांच्‍या मागणीनुसार ही थाळी तयार करण्यात आली आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने बाजरीचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश आहे. भारत सरकारच्या शिफारशीनुसार संयुक्‍त राष्‍ट्राने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्‍याचे महत्त्‍व पटवून देण्‍यासाठीच ही थाळी तयार करण्‍यात आली आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्‍या नावाने पाककृती हाेण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी पंतप्रधान मोदींच्‍या १७ सप्टेंबर वाढदिनानिमित्त दिल्लीतील एका रेस्टॉरंटने ’56 इंच मोदी जी’ थाली नावाची थाळी बनवली होती.

पंतप्रधान मोदी जून महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २१ जूनपासून सुरू होणारा त्‍यांचा हा दौरा चार दिवसांचा असेल. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन १३ जून रोजी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांच्‍या दिल्ली दौर्‍यावर येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button