पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जी २० विकास मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीचे आध्यात्मिक महत्व आणि विकासाबाबत भारताचा दृष्टीकोन यावर मत मांडले. (PM Modi at G20 meet)
G20 विकासाचा अजेंडा काशीपर्यंत पोहोचला याचा मला आनंद आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे मागे पडू न देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे मला वाटते. कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
'मदर ऑफ डेमोक्रसी' या सर्वात जुन्या शहरात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. काशी हे शतकानुशतके ज्ञान, चर्चा, संस्कृती आणि अध्यात्माचे केंद्र राहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारत हा केवळ महिला सक्षमीकरणापुरता मर्यादित नाही, तर महिलांच्या नेतृत्वाखालील देशाचा विकास आहे. महिलाच विकासाचा अजेंडा ठरवत असल्याचे सांगत पीएम मोदी यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी गेम चेंजिंग अॅक्शन प्लॅन स्वीकारण्याचे आवाहन केले.
देशाचा विकास सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत असावा. जे जिल्हे अविकसित होते अशा भारतातील १०० हून अधिक महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भारतात डिजिटलायझेशनने क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. भारत आपला अनुभव भागीदार देशांसोबत शेअर करण्यास इच्छुक आहे, असेही ते म्हणाले. (PM Modi at G20 meet)
पारंपारिक पोशाख परिधान करून G20 विकास मंत्र्यांच्या बैठकीचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी संध्याकाळी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. आरतीच्या वेळी पाहुण्यांसाठी खास शंखनाद करण्यात आला. तत्पूर्वी नमो घाटावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले होते.
हे ही वाचा :