Imran Khan Arrested : माझी हत्‍या करण्‍याचा पाकच्‍या गुप्‍तहेर संघटनेचा कट : अटकेपूर्वी इम्रान खान यांनी व्‍यक्‍त केली हाेती भीती | पुढारी

Imran Khan Arrested : माझी हत्‍या करण्‍याचा पाकच्‍या गुप्‍तहेर संघटनेचा कट : अटकेपूर्वी इम्रान खान यांनी व्‍यक्‍त केली हाेती भीती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल-कादिर ट्रस्‍ट भ्रष्‍टाचार प्रकरणी पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज ( दि.९) दुपारी अटक करण्‍यात आली. ते इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर हजर राहण्‍यासाठी आले असता ही कारवाई झाली. न्‍यायालयाच्‍या परिसरातच रेंजर्सनी ताब्यात घेतले. मात्र अटक होण्‍यापूर्वी इम्रान खान यांनी केलेल्‍या विधानाचा व्‍हिडिओ आता पाकिस्‍तान तहरीक-ए-इन्‍साफ पक्षाने व्‍हायरल केला आहे. त्‍यांनी या व्‍हिडिओमध्‍ये व्‍यक्‍त केलेली भीती आता पाकिस्‍तानमधील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ( Imran Khan Arrested )

Imran Khan Arrested : अटकेपूर्वी काय म्‍हणाले इम्रान खान ?

अटकेपूर्वी इम्रान खान म्‍हणाले की, माझ्‍याविरोधात कोणताही पुरावा नाही तरीही मला अटक करुन कारागृहात डांबले जाणार आहे. पाकिस्‍तानची गुप्‍तचर संघटना ‘आयएसआय’ने माझी हत्‍या करण्‍याचा कट रचला आहे. त्‍याची गुलामी करण्‍यापपेक्षा मी मृत्‍यूला सामोरे जाईन. मला खोट्या आरोपांमध्‍ये गोवण्‍यात येत आहे, असा दावाही त्‍यांनी केला आहे. हा व्‍हिडिओ ६ मे राेजीचा आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने इम्रानच्या अटकेपूर्वी रेकॉर्ड केलेला आणखी एक व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये इम्रान खान म्हणत आहेत की, पाकिस्तानमध्ये लोकशाही गाडली गेली आहे. यानंतर मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही. पाकिस्तानची जनता गेली ५० वर्ष मला ओळखते. मी कधीही संसदेच्या विरोधात गेलो नाही किंवा पाकिस्तानचा कोणताही कायदा मोडला नाही. मी भ्रष्ट चोरांची टोळी आणि आयात केलेले सरकार स्वीकारावे अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या हक्कासाठी बाहेर पडावे लागेल. स्वातंत्र्य हे कधी ताटात धरले जात नाही, त्यासाठी लढावे लागते. आपल्या हक्कांसाठी लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्‍यांनी या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून केले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button