Texas Shooting : टेक्सासमध्ये शाळकरी मुलांवर गोळीबार; ९ जण जखमी, ४ दिवसातील दुसरी घटना | पुढारी

Texas Shooting : टेक्सासमध्ये शाळकरी मुलांवर गोळीबार; ९ जण जखमी, ४ दिवसातील दुसरी घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत बंदुकी हिंसाचार सातत्याने होत असतो. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढतच आहेत. या वर्षात आत्तापर्यंत गोळीबारात हजारो जण गोळीबाराच्या घटनेत मारले गेलेत. पुन्हा रविवारी (दि.२४) टेक्सासमधील जास्पर प्रांतातील एका शाळेत गोळीबार झाला. शाळकरी मुलांची पार्टी सुरू असतानाच, अचानक गोळीबार झाला. यामध्ये ९ मुले जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील जॅस्पर येथील एका शाळेत किशोरवयीन मुलांची प्रोम पार्टी सुरू होती. त्याचवेळी वाद सुरू झाला आणि त्यातून गोळीबार झाले. यामध्ये ९ मुले जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सध्या पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

४ दिवसांत दुसऱ्यांदा गोळीबार

अमेरिकेत रोज कुठे ना कुठे गोळीबाराच्या बातम्या येत असतात. कुठे मुला-मुलींच्या पार्टीत गोळ्या झाडल्या जातात, तर कधी शिक्षण घेत असलेल्या मुलांना गोळ्या घातल्या जातात. चार दिवसांपूर्वी अमेरिकेतील अल्बामा राज्यातील डेडविले येथे एका मुलाच्या वाढदिवस पार्टीत गोळीबार झाला होता. ज्यामध्ये ६ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले होते.

अमेरिकेतील शाळांमध्ये गोळीबाराच्या घटनेत वाढ

टेक्सास हे अमेरिकेतील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. २० मार्चला येथील एका शाळेत गोळीबार झाला होता. तो गोळीबार एका विद्यार्थ्यानेच केला होता. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि एक महिलाही जखमी झाली होती. नंतर पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की गोळीबार आर्लिंग्टन येथील हायस्कूलमध्ये झाला होता.

३ वर्षाच्या मुलीनेही केला होता गोळीबार

टेक्सासमध्येच एका ३ वर्षीय अल्पवयीन मुलीने हातात बंदूक घेऊन अनावधानाने गोळीबार केला असल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तिच्या ४ वर्षांच्या बहिणीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना गेल्या महिन्यात १३ मार्चला घडली होती.

हेही वाचा:

Back to top button