Breaking News : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये गोळीबार; चार जवान शहीद | पुढारी

Breaking News : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये गोळीबार; चार जवान शहीद

पुढारी ऑनलाईन: पंजाबमधील भटिंडा येथील लष्कराच्या परिसरात गोळीबार झाल्याची बातमी (Breaking News) येत आहे. भटिंडा मिलिटरी स्टेशन परिसरात आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार लष्करी जवान शहीद झाले आहेत. दरम्यान मिलिटरी कॅन्टोन्मेंट परिसर सील करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

भटिंडा मिलिटरी स्टेशनवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तोफखाना युनिटचे चार लष्करी जवान शहीद झाले आहेत. इतर कोणत्याही कर्मचार्‍यांना दुखापत किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. हा परिसर सील करणे सुरूच असून, या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी पंजाब पोलिसांसह संयुक्त तपासयंत्रणेकडून समन्वय साधला जात आहे. या घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आल्याचे भारतीय लष्कर स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून, परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. लष्कर परिसरात आणि छावणीत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परिसरात तात्काळ स्टेशन क्विक रिअॅक्शन टीम्स सक्रिय (Breaking News) करण्यात आल्या असून , सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंजाब पोलीस आणि गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबाराची घटना स्टेशनच्या आर्टिलरी युनिटमध्ये घडली आहे. या परिसरात काही कुटुंबेही राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी २८ काडतुसे असलेली एक इन्सास रायफल येथील परिसरातून बेपत्ता झाली होती. या घटनेमागे लष्कराचे काही कर्मचारी असू शकतात. क्वार्टर गार्डकडून शस्त्र चोरणाऱ्या जवानाचा शोध सुरू असून गोळीबाराच्या घटनेमागे त्याचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे, असे पंजाब पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button