पुढारी ऑनलाईन : 'इस्रो'तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 3' (लाँच व्हेईकल मार्क 3) या बाहुबली रॉकेटचे दुसरे प्रक्षेपण हे रविवारी (दि.२६) होणार आहे. श्रीहरिकोटा येथून रविवारी सकाळी ९ वाजता या उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे. 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2/वनवेब इंडिया २' असे या मोहिमेचे नाव असल्याची माहिती इस्रोने ट्विट करून दिली आहे.
२३ ऑक्टोबर रोजी 'इस्रो'तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2' (लाँच व्हेईकल मार्क 3) या बाहुबली रॉकेटमधून तब्बल 36 उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले होते. 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2/वनवेब इंडिया 1' असे या मोहिमेचे नाव होते. 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड' आणि ब्रिटनमधील 'वनवेब' या स्टार्टअप कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतील सर्व उपग्रह कॅप्सूलमध्ये बसविण्यात आलेले आहेत.
आतापर्यंत इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार रॉकेटचा हा दुसरा टप्पा आहे. या मिशनमध्ये वापरण्यात आलेले रॉकेट हे सर्वात वजनदार असल्याने त्याला बाहुबली रॉकेट असे म्हटले आहे. या रॉकेटचा वापर पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपणासाठी करण्यात योत आहे. 'वनवेब' ही एक खासगी उपग्रह कंपनी आहे. या प्रक्षेपणासह न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या आपल्या व्यावसायिक शाखेच्या माध्यमातून इस्रोने जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारामध्ये पाऊल टाकले आहे.