Turkey earthquake: तुर्की, सीरियात बचावकार्याला वेग; भूकंपबळींची संख्‍या ५००० वर | पुढारी

Turkey earthquake: तुर्की, सीरियात बचावकार्याला वेग; भूकंपबळींची संख्‍या ५००० वर

पुढारी ऑनलाईन: तुर्कीत झालेल्या शक्तीशाली भूकंपाला (Turkey earthquake) ४८ तास उलटले आहेत. तरीही इमारतीच्या ढिगाऱ्यांखाली मृत देहांचा खच आढळत आहे. जगभरातील अनेक देशांनी तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारतासह इतर देशांची मदत पथके तुर्कीत दाखल झाली आहेत, त्यामुळे बचावकार्याला वेग वाढला आहे. सध्याच्या समोर आलेल्या माहितीनुसार तुर्की, सीरिया यो दोन्ही देशात मिळून भूकंपबळींची संख्‍या ५००० वर गेली आहे, अशी माहिती एपी (The Associated Press) या वृत्तसंस्थेने दिली आहे.

तुर्कीच्या उपराष्ट्रपतींनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीमध्ये 3,419 तर सीरियात 1,602 च्यावर मृतांची संख्या पोहोचली आहे. तसेच 20,534 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तुर्कीमध्ये (Turkey earthquake) 11,000 इमारतींचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती येथील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

तुर्कीत सोमवारी पहाटे झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर आज मंगळवारी (दि.७) पुन्हा एकदा मध्य तुर्कीत भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9.45 च्या सुमारास बसलेल्‍या भूकंपाची नोंद ५.५ रिश्टर स्केल इतकी करण्यात आली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेच्या वेबसाइटने दिली आहे.

हजारो नागरिक अद्याप ढिगार्‍याखालीच

शक्‍तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेल्या तुर्की आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक ढिगार्‍याखाली अडकले आहेत. कित्येक तासानंतरही मृतदेह मिळत असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्‍या मदतीने उपचारासाठी अन्‍यत्र हलवले जात आहे. दरम्यान तुर्कीतील सानलिउर्फा प्रांतात तब्‍बल २२ तासानंतर ढिगार्‍याखाली सापडलेल्‍या महिलेची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पाऊस, बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागात बचावकार्य वेगाने सुरू आहे. पण तुर्कीसह अनेक देशात पाऊस आणि बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, तुर्कीतील बचावकार्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड अडथळे येत असून, इमारतींच्या ढिगार्‍याखालून माणसांना जिवंत काढणे कठीण झाले आहे. यातूनही अनेक देशांच्या सहाय्याने येथील मदत यंत्रणा वेगाने बचावकार्य करत आहे. तसेच तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या दहा हजार होण्याची भिती येथील यंत्रणेकडून वर्तवली जात आहे.

मृतांची संख्या ‘आठ’ पटीने वाढू शकते : WHO चा दावा

तुर्की भूकंपावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ‘अशा भूकंपाच्या घटनांमध्ये सुरुवातीला मृतांची आणि जखमींची संख्या ही कमीच असते. पण कालांतराने ही संख्या वेगाने वाढते. तुर्कीतील भूकंपामुळे बेघर झालेल्यांची परिस्थितीही अशीच आहे. दरम्यान तुर्कीत भूकंपाचे धक्के बसणे सतत सुरूच असून, यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील तापमानात देखील प्रचंड बदल जाणवत आहेत. सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी देखील वाढली आहे. त्यामुळे बेघर झालेल्या लोकांवर व अन्य नागरिकांवर याचा परिणाम होऊन आणखी अडचणी वाढून, मृतांची संख्या ‘आठ’ पटीने वाढू शकते असे WHO ने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button