

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी उद्योगसमुहावर झालेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी, या मागणीवरुन संसदेत आज ( दि. ७ ) सलग चौथ्या कामकाजी दिवशी गदारोळ झाला. लोकसभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस सदस्य राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना चांगलेच सुनावले . जाणून घेवूया लोकसभेत आज नेमकं काय घडलं…
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे एकत्र फोटो सभागृहाला दाखवले. राहुल गांधींच्या कृतीवर लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोस्टरबाजी बंद करा, अन्यथा सत्ताधारी पक्षाचे लोक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अदानी यांचे एकत्रित चित्र दाखवतील, असा इशाराच लोकसभा लोकसभा अध्यक्षांनी दिला.
लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, " २०१४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी ६०९ क्रमांकावर होते. नेमकी काय जादू झाली माहित नाही अदानी दुसऱ्या क्रमांकावर आले. लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? अदानी आणि नरेंद्र मोदी यांचे नाते हे अनेक वर्षांपूर्वीपासून सुरु झाले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी दिल्लीत पोहोचले आणि यानंतर त्यांची जादू सुरू झाली."
भारत जोडो यात्रेदरम्यान मला देशातील विविध राज्यांमध्ये अनेक तरुण भेटले. त्यांनी अग्निवीर योजनेवर नाराजी व्यक्त केली. पूर्वी भारतीय सैन्यदलात १५ वर्षे नोकरीसह पेन्शन मिळत असे, मात्र आता चार वर्षांनी नोकरीवरून काढून टाकले जाईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मी काही वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना लष्कराच्या बाजूने आलेली नाही. ती लादण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी अग्निवीर योजना लष्करावर लादली यामध्ये आरएसएसचाही हात आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
हेही वाचा :