‘सो मेनी बेवडाज…’ने रेल्वे प्रशासनाला जाग; प्रवाशाच्या ट्विटने स्थानकावरील भोंगळ कारभार उघड | पुढारी

‘सो मेनी बेवडाज...’ने रेल्वे प्रशासनाला जाग; प्रवाशाच्या ट्विटने स्थानकावरील भोंगळ कारभार उघड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीसमोरच अनेक जण झोपले, त्यामुळे एका प्रवाशाने रेल्वेला याची ट्वीटद्वारे माहिती दिली. मात्र, त्याने केलेले ट्वीट सध्या खूपच चर्चेत असून, यात लिहिलेला मजकूर वाचून हास्याचा एकच फवारा उडत आहे.
प्रवाशाने आपल्या ट्वीटमध्ये “सो मेनी बेवडाज स्लिपींग फ्रंट ऑफ तिकीट विंडो अ‍ॅट पुणे रेल्वे स्टेशन” असे लिहून पुणे स्टेशनवरील सद्य:स्थितीची माहिती रविवारी (दि.22) रेल्वे प्रशासनाला दिली.

त्याने सांगितल्यानुसार आणि ट्वीट केलेल्या फोटोत पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीसमोरच अनेक लोक झोपल्याचे पहायला मिळते, यामुळे तिकीट काढायला आलेल्या प्रवाशांना कसरत करून तिकीट काढावे लागत आहे. दरम्यान, या स्थितीवरून पुणे रेल्वे स्थानकावर भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसत असून, रेल्वे स्थानकाची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

रेल्वे व्यवस्थापकांनी दिला प्रतिसाद
प्रवासी झुबीर शेख याने रविवारी हे ट्वीट केले आहे. त्यात त्याने पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीसमोर झोपलेल्या नागरिकांचे फोटो अपलोड केले आहेत. या ट्वीटला रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांनी प्रतिसाद दिला असून, याकडे पुणे रेल्वे सुरक्षा बलाने लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.

प्रवाशाने ट्वीटवरच सुनावले…
रेल्वे स्थानकावर पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांना आणि रेल्वे कर्मचार्‍यांना ही स्थिती दिसत नसेल का ? प्रवाशांना हे ट्वीट करायची वेळ का यावी ? असे प्रवासी अमोद भावे यांनी ट्वीटरवरच रेल्वे प्रशासनाला सुनावले आहे.

Back to top button