China Nuclear Warhead : चीन २०३५ पर्यंत १५०० हून अधिक अण्वस्त्रे तयार करणार; अमेरिकेचा दावा | पुढारी

China Nuclear Warhead : चीन २०३५ पर्यंत १५०० हून अधिक अण्वस्त्रे तयार करणार; अमेरिकेचा दावा

वॉश्गिंटन; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनकडून चीनबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 2035 पर्यंत चीन सुमारे 1500 अण्वस्त्रांचा साठा तयार करेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सध्या चीनकडे 400 अण्वस्त्रे आहेत. अशा प्रकारे चीन पुढील 12 वर्षांत दुप्पट वेगाने काम करत अण्वस्त्रांची निर्मिती करणार आहे. (China Nuclear Warhead)

पेंटागॉनने काँग्रेसला सादर केलेल्या वार्षिक अहवालात चीनच्या महत्त्वाकांक्षी लष्करी योजनेचा पर्दाफाश केला आहे. पेंटागॉनने सांगितले, की पुढील दशकात चीनचे अणुऊर्जेचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.(China Nuclear Warhead)

पेंटागॉनने आपल्या अहवालात हे सुद्धा सांगितले आहे की, कशाप्रकारे चीन जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून अमेरिकेला आव्हान देऊ पाहतोय. यासाठीच तो अण्वस्त्रांचा साठा सतत वाढवण्यावर काम करत आहे.(China Nuclear Warhead)

काय सांगतो अहवाल (China Nuclear Warhead)

पेंटागॉनच्या अहवालात असे म्हटले आहे, की चीन जमीन, समुद्र आणि हवेतून सोडल्या जाणार्‍या अण्वस्त्रांची संख्या सातत्याने वाढवत आहे. यासोबतच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही तयार करण्यात गुंतला आहे.

चीन फास्ट ब्रीडर रिअॅक्टर्स आणि रिप्रोसेसिंग युनिट्स बांधून प्लुटोनियम वेगळे करून अण्वस्त्रे तयार करत आहे. चीनने 2021 मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त अण्वस्त्रे तयार केली आहेत.

अहवालात असे ही म्हटले आहे की, 2035 पर्यंत चीनने आपल्या सैन्याचे पूर्णपणे आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्याची योजना आखली आहे. चीनने या गतीने आपली आण्विक क्षमता वाढवत राहिल्यास 2035 पर्यंत तो सुमारे 1500 अण्वस्त्रे तयार करेल.

एका वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍याने सांगितले की, चीनची रणनीती देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांद्वारे आपली राष्ट्रीय शक्ती वाढवण्याची आहे, जेणेकरून तो जागतिक स्तरावर स्वतःला आणखी मजबूत करू शकेल.

त्यांनी सांगितले, की चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सैन्याचा वापर करत आहे. आगामी काळात अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी हे सर्वात मोठे आव्हान असू शकते. चीन सतत म्हणत आहे, की त्यांची शस्त्रे स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत. पण, तसे नाही. जगात आपली भीती निर्माण करण्यासाठी तो शस्त्रांचा साठा सातत्याने वाढवत आहे, ज्यामध्ये समुद्र, हवा आणि जमिनीवरून मारण्यासाठी धोकादायक अण्वस्त्रांचा समावेश आहे.

तैवानवर चीनच्या राजनैतिक, आर्थिक, राजकीय आणि लष्करी दबावाचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. 2021 आणि 2022 मध्ये चीनने तैवानवर आपला लष्करी दबाव कसा वाढवला, विशेषत: नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीदरम्यान ते सांगण्यात आले.

पेंटागॉनच्या अहवालात युद्धासह इतर काही महत्त्वाच्या पैलूंबद्दलही सांगितले आहे.

अधिक वाचा :

Back to top button