पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य चीनमधील हेनान प्रांतातील रसायने आणि इतर औद्योगिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असून दोन बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आन्यांग शहरातील कारखान्यात ही घटना घडली. अन्यांग हे शहराचे हायटेक झोन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कारखान्याला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक तास मेहनत घ्यावी लागली. २०० हून अधिक बचाव कर्मचारी आणि सुमारे ६० अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. या घटनेनंतर परिसरात काही तास गोंधळ उडाला. अहवालानुसार, अग्निशमन दलाच्या पथकांनी ६३ गाड्या घटनास्थळी पाठवल्या होत्या. रात्री ११ वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातात कंपनीतील किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, याबाबत कोणतीही माहीती मिळालेली नाही.
यापूर्वी मार्च २०१९ मध्ये शांघायपासून २६० किलोमीटर अंतरावर असलेल्या यानचेंग येथील रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता. या दुर्घटनेत सुमारे ७८ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. २०१५ मध्येही उत्तर तियानजिन येथील रासायनिक गोदामात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात १६५ जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा :