रावसाहेब दानवेंचे वक्तव्य म्हणजे मध्यावधी निवडणुकांचे संकेत : संजय राऊत | पुढारी

रावसाहेब दानवेंचे वक्तव्य म्हणजे मध्यावधी निवडणुकांचे संकेत : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : रावसाहेब दानवे कधीकधी चुकून खरे बोलून जातात, त्यांनी दोन महिन्यानंतरच्या मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकार लवकरच पडू शकते, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर बेळगाव सीमाप्रश्नी पंतप्रधानांची भेट घेऊन सीमावासीयांची कैफियत मांडावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राऊत म्हणाले की, अन्यायाचा बुलडोझर वारंवार फिरवला जात असेल, तर विरोधक म्हणून त्याच्याशी लढण्याची आमची तयारी आहे. सगळेच पळकुटे नसतात, काही लढणारे आहेत, असे ते म्हणाले. सीमाप्रश्नी मंत्रीस्तरीय समितीबाबत बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत सीमाप्रश्नी अनेक मंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युपीए सरकारच्या काळात दोन्ही वेळेला बेळगाव संदर्भातील विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटलांवर तर तेथील जबाबदारी होती. दोन मंत्र्यांपैकी कितीजण बेळगावात गेले. मुख्यमंत्री शिंदे किंवा चंद्रकांत पाटील कधीही सीमावासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी बेळगावात पोहचले नाहीत. आता मुख्यमंत्री असताना काय दिवे लावणार, त्यांनी आगोदर बेळगावात जावे. सीमाभागातील तरूणांवर खोटे गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते दाखवून द्या. पण ज्या महाराष्ट्रातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहते. अपमान करणाऱ्यांचा बचाव करते ते सीमावासीयांना काय न्याय देणार, असे खडेबाल राऊत यांनी सुनावले आहेत.

ठाकरे-आंबेडकर एकत्र येणे देशाच्या हिताचे आहे. महाराष्ट्र आणि देशात परिवर्तन घडविण्यासाठी आंबेडकरांसह इतर विरोधी पक्षांनी एकत्र येणे हा देशासाठी आदर्श असा फॉम्युला होऊ शकतो. तसेच पक्षप्रमुखांशी चर्चा करून भारत जोडो यात्रेत एक दिवस सामील होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button