सावधान! नागरिकांनो धुळीपासून रहा सावध; कर्जत शहरात अनेकांना जडलाय श्वसनाचा आजार | पुढारी

सावधान! नागरिकांनो धुळीपासून रहा सावध; कर्जत शहरात अनेकांना जडलाय श्वसनाचा आजार

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : सावधान! कर्जत शहरात येणार असाल, तर मास्क लावून या, अन्यथा श्वसनाच्या आजाराची शिकार व्हावे लागेल. श्वसनाचा त्रासाने शहरात अनेक जण आजारी पडले आहेत, तरी संबंधित विभाग शहरातील धुळीचा बंदोबस्त करायला राजी नाहीत. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

शहरातील धुळीचा विषय अतिशय गंभीर निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येने लहन व अवजड वाहने ये-जा करीत असून. या प्रत्येक वाहनाबरोबर हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड धुळीचे लोट उडत आहे. धुळीचे कण नाकावाटे थेट शरीरात प्रवेश करीत आहे. यामुळे शहरातील मेन रोडवरील अनेक व्यापारी श्वसनाच्या त्रासाने आजारी पडले आहेत.

शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूळ उडताना दिसून येते. या धुळीमुळे कर्जतकर त्रस्त झाले आहेत. यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना शासकीय यंत्रणा, तसेच नेतेमंडळी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. कर्जत-नगर हा शहरात मुख्यरस्ता आहे. या रस्त्यावर सेकंदाला एक वाहन जाते. लहान आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूकहोते.

अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालय दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर नावालाच शिल्लक राहिले आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहन गेले की धुळीचे लोट हवेमध्ये उडतात. वाहनान पाठीमागे वाहन असल्यामुळे हे लोट खाली बसतच नाही, तर सातत्याने हवेत उडत आहेत, ही सर्व धूळ नाकावाटे परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या शरीरामध्ये जात आहे.

या रस्त्याचे काम मंजूर आहे, परंतु दिवाळीपूर्वी सुरू केलेले काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना संपर्क केला असता, लवकरच काम सुरू होणार आहे, असे सांगत आहेत. सर्व व्यापार्‍यांकडून नगरपंचायत कर आकारणी करून दरमहा लाखो रुपये गोळा करते. मात्र, या बदल्यात व्यापार्‍यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहनांमुळे धूळ उडते. नगरपंचायत चे स्वच्छता महिला कर्मचारी रोज रात्री हा रस्ता झाडतात . त्यामुळे आणखी धूळ उडते आहे .

रस्ता झाडण्यापूर्वी नगरपंचायतीने पाण्याचा टँकर सर्वत्र फिरवला आणि नंतर रस्ता स्वच्छ करण्याची गरज आहे. मुख्याधिकार्‍यांकडून आश्वासनाशिवाय दुसरी काहीही दिले जात नाही. नगरपंचायतीने टँकरचा वापर करावा व त्याचा खर्च ठेकेदाराच्या बिलामधून कपात करा, तसेच किमान रात्रीची झाडलोट बंद केली, तर धूळ उडणार नाही, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

पाण्याच्या टँकरची गरज
मुख्य रस्त्यावरची धूळ उडत आहे. यावर काम होईपर्यंत रोज दिवसभरातून किमान चार वेळा संपूर्ण रस्त्यावर भरपूर पाणी मारण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी ठेकेदाराला याबाबत सूचना दिल्या. मात्र, ठेकेदार 24 तासांमध्ये फक्त एकवेळा टँकरने पाणी मारत आहे. तेही अनेक ठिकाणी रस्ता कोरडा राहत आहे, यामुळे धुळीचा त्रास मात्र कायम आहे.

कोरोना गेला तरी मास्क कायम
शहरातील या मुख्य रस्त्यावर अनेकजण मास्क वापरताना दिसून येतात. कोरोना हद्दपार झाला, तरी देखील धुळीच्या रूपाने निर्माण होणार्‍या आजारापासून सुसंरक्षण व्हावे, म्हणून अनेकजण दिवसभर मास्क वापरत आहेत. मास्क वापरला तरी देखील अनेक जण आजारी पडले आहेत.

Back to top button