

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर ऋषी सुनक यांनी भारतीयांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी दरवर्षी ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी भारतीय तरुण व्यावसायिकांना ३,००० व्हिसा देण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. ही योजना ब्रिटनने भारतीयासांठी खुली केल्याने, भारत या योजनेचा लाभ घेणारा एकमेव आणि पहिला देश आहे.
ऋषी सुनक यांच्या निर्णयानंतर, ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्रिटन-भारत यंग प्रोफेशनल्स स्कीमची आज पूर्तता झाली आहे. ज्याद्वारे 18-30 वर्षे वयोगटातील भारतीय पदवीधर आणि शिक्षण घेणाऱ्या भारतीय युवक नागरिकांना दरवर्षी ३००० व्हिसा आणि दोन वर्षे काम करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे ट्विट करत ब्रिटन पीएमओकडून सांगण्यात आले आहे.
G20 शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांची भेट झाली. यानंतर त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ब्रिटिश सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात ब्रिटमनने सांगितले आहे की, या योजनेचा प्रारंभ म्हणजे, भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठीचा महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारत प्रशांत क्षेत्राबरोबरच दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीही मदत करेल, असे ब्रिटन सरकारकडून सांगण्यात आले आहे.