युक्रेनमधील युद्ध थांबवा, तोडगा काढा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जी-20’च्या मंचावरून आवाहन | पुढारी

युक्रेनमधील युद्ध थांबवा, तोडगा काढा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जी-20’च्या मंचावरून आवाहन

बाली : वृत्तसंस्था : बर्‍याच महिन्यांपासून युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेले युद्ध थांबणे गरजेचे आहे. युद्धबंदी आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. जगात शांतता नांदावी, यासाठी जी-20 सदस्य देशांनी ठोस आणि एकत्रित पावले उचलावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जी-20 परिषदेतील आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी जगासमोरील आव्हानांचा परामर्श घेतला.

बाली येथील ‘अपूर्वा केम्पिन्स्की’ या राजेशाही रिसॉर्टमध्ये जी-20 शिखर परिषद मंगळवारपासून सुरू झाली. जगातील 20 देशांचे राष्ट्रप्रमुख, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेते या परिषदेला उपस्थित आहेत. परिषदेच्या पहिल्या सत्रात बोलताना मोदी यांनी, युक्रेन-रशिया युद्धाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. जागतिक मंचावर त्यांनी पुन्हा एकदा मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच हा तिढा सोडवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतर जग उद्ध्वस्त झाले तेव्हा अनेक दिग्गज नेत्यांनी शांततेसाठी प्रयत्न करत यश मिळवले. आता आपल्या सर्वांना ते करावे लागणार आहे. रशियाचे नाव न घेता मोदींनी युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन केले. जगात शांतता नांदावी, यासाठी जी-20 सदस्य देशांनी ठोस आणि एकत्रित पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

जगाची पुरवठा साखळी तुटली

अन्न व ऊर्जासुरक्षा यावर बोलताना ते म्हणाले, कोरोना आणि पाठोपाठ युक्रेन युद्ध, यामुळे जगभरात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक पुरवठा साखळी तुटल्यासारखी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे हे संकट आहे. प्रत्येक देशातील गरिबांची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. हेच आज जगासमोर असलेले मोठे आव्हान आहे.

130 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा

कोरोनाच्या काळात भारताने 130 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा दिली. कठीण काळात लोक उपाशी राहू नयेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले. एवढेच नव्हे, तर अनेक देशांना भारताने अन्नधान्याचा पुरवठा केला. खतांची टंचाई हे अन्नसुरक्षेच्या बाबतीत मोठे संकट आहे. आजची खतटंचाई ही उद्याची अन्नधान्याची टंचाई आहे हे ध्यानात घ्यावे लागेल, असे मोदी म्हणाले.

Back to top button